गुलाम नबींच्या समर्थनार्थ एकवटले 'गांधी-23', सिब्बलांचा काँग्रेसला सल्ला; जाणून घ्या, कोण-कोण काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 03:31 PM2021-02-27T15:31:30+5:302021-02-27T15:41:26+5:30
जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. (Ghulam Nabi's Jammu kashmir rally)
जम्मू - राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi) जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबत जी-23 (G-23) चेही अनेक नेते उपस्थित आहेत. जम्मूमध्ये शनिवारी रॅलीदरम्यान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिल्लीहून आलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांचे स्वागत केले. (G-23 leaders in Ghulam Nabi's Jammu kashmir rally Kapil Sibbal said party has weakened we must accept it)
यावेळी बोलताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपील सिब्बल (Kapil Sibbal) म्हणाले, काँग्रेस पक्ष कमकुवत झाला आहे आणि आपल्याला याला बळकट करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला हवी. यावेळी कपील सिब्बल यांनी विमानाचे उदाहरण दिले. जेव्हा आपण विमानाने जातो, तेव्हा पायलट सोबत एका इंजिनिअरचीही आवश्यकता असते. असा इंजिनिअर ज्याला या तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती असेल. गुलाम नबी आझाद काँग्रेससाठी याच भूमिकेत आहेत. त्यांना देशातील सर्वच राज्यांमधील तळागाळातील परिस्थितीची जाण आहे.
गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश; दिग्विजय सिंह म्हणाले, "आम्हाला..."
देश आणि काँग्रेसला गुलाम नबींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता -
काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले, आझाद एक एकनिष्ठ काँग्रेस नेते आहेत. जे नेते काँग्रेसला चांगल्या पद्धतीने समजतात त्यांपैकी एक आझाद आहेत. काँग्रेस आणि देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. यावेळी भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, एखाद्या राज्याला तोडून दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले, असे यापूर्वी कधीही झाले नाही. जम्मू काश्मीरचे तुकडे केले आणि आपण यासाठी लढत राहिलो.
G-23 नव्हे, गांधी-23 - राज बब्बर -
काँग्रेस नेते राजबब्बर म्हणाले, आपल्याला जी-23 म्हटले जाते. मात्र, आपण गांधी -23 आहोत. काँग्रेस बलशाली व्हावी, अशी गांधी-23ची इच्छा आहे. पक्षाच्या आदर्शांमुळेच गुलामनबी मोठे झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या निवृत्तीवर भावूक झाले होते.
"अनुच्छेद ३७० हे भाजप सरकारच रद्द करेल, हे मला माहिती होते": गुलाम नबी आझाद
तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, आणखीही काही नेत्यांची या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, मी त्यांना थांबवले. तसेच, लोक लगेचच उलट सुलट अंदाज बांधायला सुरुवात करतील, असे म्हणालो. मी त्यांना पुढच्या वेळी यायला सांगितले. यावेळी त्यांनी आनंद शर्मा आणि भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे स्वागत केले. याच वेळी, येथे उपस्थित असलेल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी संसदेत जम्मू काश्मीरच्या लोकांचा आवाज उचलला आहे, असेही त्यांनी सांगितले.