नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या विकासकामांमुळे पाकिस्तानचा तिळपापड होत आहे. यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली. (Pakistan does not like the development of Jammu and Kashmir)
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्गठन दुरुस्ती विधेयकावरील चर्चेला उत्तर दिले. त्यावेळी ते बोलत होते. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये घुसखोरी, दगडफेक, दहशतवादी घटनांच्या संख्येत घट झाल्याचे रेड्डी यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील जनतेला अनुच्छेद ३७० नको आहे. स्थानिक जनतेला विकास हवा आहे. स्थानिक तरुणांना अधिकाधिक रोजगार मिळावा, अशी मागणी आता जम्मू-काश्मीरमधून केली जात आहे. यामुळे पाकिस्तानने घुसखोरीच्या प्रयत्नांत वाढ केली, असे रेड्डी यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी राज्यसभेत दिली एमएसपीची हमी, आता राकेश टिकैत म्हणतात...
२०१९ मध्ये पाकिस्तानकडून २१६ वेळा घुसखोरीचे प्रयत्न झाले. २०२० मध्ये यात घट होऊन घुसखोरीच्या प्रकरणांची संख्या ९९ झाली. तसेच २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १२७ जण जखमी झाले. तर, २०२० मध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये ७१ स्थानिक जखमी झाले, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
सन २०१९ मध्ये विविध घटनांत जम्मू-काश्मीरमध्ये १५७ दहशतवादी मारले गेले. तर, २०२० मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या २२१ वर गेली. २०१९ मध्ये ५९४ दहशतवादी घटना आणि २०९ दगडफेकीच्या घटना घडल्या. तर २०२० मध्ये ही संख्या अनुक्रमे २२४ आणि ३२७ वर गेली, असेही रेड्डी यांनी सांगितले. रेड्डी यांनी चर्चेला दिलेल्या उत्तरानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले.