G20 Meeting: राजधानी दिल्लीत 8-10 सप्टेंबर रोजी G20 ची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख येणार आहेत. भारत सरकारने यासाठी जय्यत तयारी केली आहे. विशेष म्हणजे, या पाहुण्यांसाठी शेकडो आलिशान वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने पाहुण्यांसाठी सुमारे 150 आलिशान आणि 300 हाय एंड वाहनांची 6 दिवसांसाठी बुकिंग केली आहे. G-20 चा मुख्य कार्यक्रम तीन दिवसांचा आहे, परंतु गाड्यांची सुरक्षितता जाणून घेण्यासाठी तीन दिवस चाचण्या घेण्यात येणार आहेत.
गाड्या कुठून येणार?मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील आलिशान गाड्यांची संख्या कमी पडत आहे, त्यामुळे विविध राज्यांमधून या गाड्या मागवल्या जात आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून आलिशान गाड्या मागवल्या जात आहेत. विशेष म्हणजे, सरकार या गाड्या भाड्याने घेत असून, त्यासाठी 50 हजारांपासून 2 लाखांपर्यंतचे भाडे भरणार आहे.
दरम्यान, अनेक देश आपल्या राष्ट्राच्या प्रमुखांसाठी त्यांच्या देशातील सुरक्षित गाड्या घेऊन फिरतात. अशा परिस्थितीत त्यांच्या सोबत असलेल्या प्रतिनिधींसाठी या आलिशान गाड्या कामी येणार आहेत. राजधानी दिल्लीत होणारा हा कार्यक्रम अविस्मरणीय करण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे.