भारतात होत असलेल्या G20 शिखर परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन दिल्लीत पोहोचले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भारतात आले आहेत. विमानतळावर केंद्रीय मंत्री व्ही के सिंह यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले आहेत.
पंतप्रधानांनी केले ट्विट - पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, 7, लोक कल्याण मार्गावर ज्यो बायडेन यांचे स्वागत करून आनंद वाटला. आमची भेट खूप सार्थक ठरली. आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली. जे भारत आणि अमेरिकेत आर्थिक आणि लोकांमधील संबंध आणखी चांगले करतील. या दोन्ही देशांची मैत्री विश्व कल्यानात एक महत्वाची भूमिका पार पाडेल.
या मुद्द्यांवर झालेली असू शकते चर्चा -पीएम मोदी आणि ज्यो बायडेन यांच्या द्विपक्षीय बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटवरून लक्षात येते. या दोन्ही नेत्यांमध्ये संरक्षण सहकार्य, दहशतवादाला विरोध, सायबर सुरक्षा सहकार्य, व्यापार आणि आर्थिक संबंध, भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार, व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा क्षेत्र, हवामान बदल, अंतराळ सहकार्य, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य, शिक्षण, सांस्कृतिक सहकार्य, इंडो-पॅसिफिक, आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय संबंध आणि तंत्रज्ञान आदी काही मुद्द्यांवर चर्चा झालेली असू शकते.