"विकास पोहतोय...", पावसामुळं 'भारत मंडपम'मध्ये भरलं पाणी; काँग्रेसनं साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 01:16 PM2023-09-10T13:16:52+5:302023-09-10T14:19:43+5:30

नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेदरम्यान मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्रमस्थळी अडचणी वाढल्या आहेत.

g20 summit 2023 delhi bharat mandapam flooded after rain congress jibes pm narendra modi | "विकास पोहतोय...", पावसामुळं 'भारत मंडपम'मध्ये भरलं पाणी; काँग्रेसनं साधला निशाणा

"विकास पोहतोय...", पावसामुळं 'भारत मंडपम'मध्ये भरलं पाणी; काँग्रेसनं साधला निशाणा

googlenewsNext

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेसाठी देशाच्या राजधानीत जागतिक नेत्यांचा कुंभमेळाच जमला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक नेते जी २० परिषदेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी २० परिषदेदरम्यान मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्रमस्थळी अडचणी वाढल्या आहेत.

जी २० सदस्यांच्या मेजवानीसाठी बांधलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सर्वत्र पाणी दिसत आहे. यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पाण्याने भरलेल्या भारत मंडपमचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांनी म्हटले आहे की, "जी २० सदस्यांच्या मेजवानीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या 'भारत मंडपम'चे फोटो. विकास पोहत आहे..."

दुसरीकडे, हाच व्हिडिओ एक्सवर काँग्रेसच्या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म आयएनसी-टीव्हीने देखील शेअर केला आहे. पोकळ विकासाची पोलखोल झाली. जी २० साठी भारत मंडपम तयार करण्यात आला. २७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. एका पावसात पाणी वाहून गेले, असे हा व्हिडिओ शेअर करताना आयएनसी-टीव्हीने म्हटले आहे. दरम्यान, या भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह ३० हून अधिक देश आणि संघटनांच्या नेत्यांसाठी मेजवानीचे आयोजन केले होते.

भारत मंडपममध्ये रचला इतिहास
जी २० परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत मंडपममध्ये इतिहास रचला गेला. भारताच्या अध्यक्षतेखाली या जी २० परिषदेत आफ्रिकन युनियननेही औपचारिक प्रवेश केला. यासोबतच नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित करण्यात आला. हे घोषणापत्र पारित होणे हे देशासाठी मोठा विजय असून भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जात आहे. जाहीरनाम्यात भारताचा नऊ वेळा उल्लेख करण्यात आला. तसेच,  रशिया-युक्रेनच्या संवेदनशील मुद्द्यावर सर्व नेत्यांना संयुक्त निवेदनावर सहमती मिळवून देणे ही त्याची सर्वात मोठी उपलब्धी होती. १०० हून अधिक मुद्द्यांवर एकमत निर्माण करून भारताने या व्यासपीठावर ग्लोबल साउथचा एक प्रमुख आवाज म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख प्रस्ताव
- सर्व देश शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करतील. भारताच्या पुढाकारात ‘एक भविष्य आघाडी’ स्थापन होईल.
- जैविक इंधन आघाडीची स्थापना केली जाईल. आघाडीत भारत, अमेरिका आणि ब्राझील संस्थापक सदस्य असतील.
- एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य यावर जोर दिला जाईल.
- बहुपक्षीय विकास बँकांना बळ दिले जाईल. त्यांना अधिक कार्यक्षम केले जाईल.
- क्रिप्टोकरन्सीसंदर्भात जागतिक पातळीवर धोरण निश्चित करण्यासाठी चर्चा केली जाईल. कर्जप्रणालीसाठी आणखी चांगली व्यवस्था निर्माण करणे. वेगाने - विकसित होणाऱ्या शहरांना निधी उपलब्ध करणे.
- हरित आणि अल्प कार्बन ऊर्जा तंत्रज्ञानासाठी काम केले जाईल.
- दहशतवादाचा सर्व देशांकडून विरोध केला जाईल. 
- अण्वस्त्रांचा वापर किंवा हल्ल्याची धमकी देणे अस्वीकारार्ह असेल. एखाद्या देशाच्या भूभागावर ताबा घेण्याचा किंवा त्याबाबत धमकी देण्यास विरोध करणे. तसेच सर्व देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखणे.
- मानवी दुःख, जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षिततेसाठी युक्रेनमधील युद्धाच्या नकारात्मक प्रभावांवर प्रकाश टाकणे. युक्रेनमध्ये व्यापक, न्यायसंगत आणि दीर्घकालीन शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करणे. 
- कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित धोके लक्षात घेता, त्याचा सकारात्मक वापर करण्यावर भर देणे. निर्णयप्रक्रियेत महिलांना पूर्ण, समान.
 

Web Title: g20 summit 2023 delhi bharat mandapam flooded after rain congress jibes pm narendra modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.