India China Relations: राजधानी दिल्लीत आयोजित G20 शिखर परिषदेचा (G20 Summit) आज समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जगाला शांततेचा संदेश देत या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता केली. दरम्यान, ही परिषद संपल्यानंतर काही मिनिटांतच भारतानेचीनला (India China Relation) मोठा संदेश दिला आहे. लडाखमधील (Ladakh) न्योमा येथे भारत जगातील सर्वात उंच लढाऊ एअरफील्ड (Fighter AirField) बांधणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) 12 सप्टेंबर 23 रोजी जम्मूतील देवक पुलावरून या प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. LAC वर चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्व लडाखमधील महत्त्वाच्या न्योमा पट्ट्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) द्वारे नवीन एअरफील्ड बांधण्यासाठी एकूण 218 कोटी रुपये खर्च येणार आहे. सीमेवर चीनला कडवी टक्कर देण्यासाठी या एअरफील्डचे बांधकाम अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
दरम्यान, राजनाथ सिंह यांनी सोशल मीडियाद्वारे G20 परषदेवर भाष्य केले. 'नवी दिल्लीत ऐतिहासिक G20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारताने जगावर आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. बैठकीत सर्व देशांची सहमती जागतिक विश्वासाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि जागतिक विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक मैलाचा दगड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विश्वगुरू' आणि 'विश्व बंधू' या दोन्ही रूपात भारताची ताकद यशस्वीपणे दाखवून दिली आहे.'
दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहेपूर्व लडाखमधील न्योमा अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंडचा वापर तीन वर्षांपूर्वीपासून केला जात आहे. चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान, सैन्य आणि साहित्य वाहतूक करण्यासाठी याचा वापर केला जातोय. 2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये अजूनही तणाव कायम आहे.