जी-२० शिखर परिषदेतभारताचा जलवा दिसून येत आहे. दिल्लीत सुरू असलेल्या या परिषदेत भारताची शक्ती जगाला दिसून येत आहे. जगातील प्रमुख देशांना एकाच मंचावर आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जगभरात भेडसावत असलेल्या महागाई, बेरोजगारीच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच जगाला भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी भारताकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केले आहे. जर आम्ही विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक केली तर सर्वांनाच फायदा मिळेल, असे बायडन यांनी म्हटलं आहे.
जो बायडन यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर त्यांनी लिहिलंय की, जागतिक अर्थव्यवस्था वातावरणातील बदलांचं संकट, नाजुकता आणि संघर्षाच्या धक्क्यांनी त्रस्त आहे. अशा परिस्थितीत यावर्षीच्या शिखर संमेलनाने जी-२० आजही आमच्यासमोरील सर्वात गंभीर मुद्द्यावर तोडगा काढू शकते, हे सिद्ध झाले आहे.
वन अर्थ, वन फँमिली, वन फ्युचर यावर यंदाच्या जी-२० शिखर परिषदेचं लक्ष आहे. या भागीदारीबाबत आज आम्ही बोलत आहोत. आम्ही प्रादेशिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टबाबत अनेक देश आणि अनेक क्षेत्रांत काम करत आहोत. आम्ही शिप आणि रेल्वे मध्ये गुंतवणूक करत आहोत जी भारत आणि युरोपला जोडेल. त्यातून अनेक संधींची निर्मिती होईल. जगातील महागाईच्या मुद्यावर आम्ही एकत्र आहोत. येथे आम्ही जो निर्णय घेऊ तो येणाऱ्या दशकांमध्ये आमच्या भविष्याला प्रभावित करेल.
बायडन पुढे म्हणाले की, चला मिळून आपण यावर काम केलं पाहिजे. जेव्हा आम्ही वाढत्या अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करू तेव्हा सर्व अर्थव्यवस्थांना फायदा होईल. जेव्हा आम्ही भविष्य आणि लोकांमध्ये गुंतवणूक करू तेव्हा प्रत्येक ठिकाणी राहणाऱ्या लोकांना याचा लाभ मिळेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० समिटच्या पहिल्याच दिवशी सर्व २० देशांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले. अमेरिका आणि रशिया व चीन या दोन गटांनी भारताच्या मताशी सहमती दर्शवत जगावर घोंघावत असलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी मिळून काम करण्याची इच्छा व्यक्त केली.