- सुनील चावके नवी दिल्ली - ब्रिटन आणि जगभरातील सुमारे बाराशे स्वामीनारायण मंदिरांच्या शृंखलेतील सर्वात मोठे मंदिर ठरलेल्या अक्षरधाम मंदिरात सपत्नीक दर्शन घेत जी-२० संमेलनातील सर्वात तरुण पंतप्रधान ऋषी सुनक यांनी रविवारी आपल्या हिंदुत्वाची पुन्हा एकदा साक्ष पटवली.
मंदिर परिसरात पावसात छत्री घेऊन सुनक दाम्पत्य अनवाणी चालत गेले. पाऊणतासाच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी एका मंदिरात जलाभिषेक केला आणि मंदिरातील सर्व देवदेवतांना फुले वाहून गुडघे टेकून साष्टांग दंडवत केला.
सुनक दाम्पत्य सुमारे तासभर मंदिरात होते. सुनक यांनी निवेदनात म्हटले आहे की, “आज सकाळी स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देऊन मला आणि माझ्या पत्नीला आनंद झाला. या मंदिराचे सौंदर्य, तेथील शांतता, सौहार्द आणि एक चांगला माणूस बनण्याचा सार्वत्रिक संदेश पाहून आम्ही थक्क झालो. हे केवळ प्रार्थनास्थळच नाही तर एक ऐतिहासिक स्थळही आहे, जे भारताची मूल्ये, संस्कृती आणि जगाला दिलेले योगदान दर्शवते.’’
२० लाख भारतीय ब्रिटनमध्ये आहेत. १४ स्वामी नारायण मंदिरे तेथे आहेत.२०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुनक यांच्यासाठी इंग्लंडमध्ये राहणाऱ्या लाखो भारतीयांची मते महत्त्वाची ठरणार आहेत.