नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेसाठी अवघा भारत सज्ज झाला असून, जगभरातील प्रमुख नेते भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे या परिषदेत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परिषदेच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रीय राजधानीत, विशेषतः नवी दिल्ली जिल्ह्यात सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिस, निमलष्करी दल आदींनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवत आहेत.
दिल्ली पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दल तैनात केले आहे, सीमा भागात गस्त वाढवली आहे. ५०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी, के-९ श्वानपथक आणि अश्वारूढ पोलिसांची तैनाती करण्यात आली आहे. भारतीय हवाई दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) आणि काही केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचीही मदत घेतली जात आहे.
आफ्रिकन संघाचे स्वागत करण्यासाठी युरोपियन संघ उत्सुक
जी-२० शिखर परिषदेत आफ्रिकी संघाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे युरोपीय संघाने शुक्रवारी सांगितले. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी ही माहिती देत त्यांच्या समावेशाला पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जूनमध्ये जी-२० नेत्यांना पत्र लिहून नवी दिल्ली येथे होणाऱ्या शिखर परिषदेत आफ्रिकी संघाला गटाचे पूर्ण सदस्यत्व देण्याचा आग्रह धरला होता.
तिबेटी युवक काँग्रेसची निदर्शने
तिबेटी युवक काँग्रेसने शुक्रवारी उत्तर दिल्लीतील ‘मजनू का टिला’ परिसरात चिनी प्रतिनिधींच्या शिखर परिषदेत सहभागाविरोधात निदर्शने केली. आंदोलकांनी हातात फलक घेऊन चीनविरोधी घोषणा दिल्या.