ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्मचा-यांचे महिनो महिन्याचे वेतन थकवणा-या विजय मल्ल्याने स्वत: अब्जोपती असताना राज्यसभेचा खासदार म्हणून मिळणारे वेतन आणि भत्ते कधीही सोडलेले नाहीत. बरेलीतील कार्यकर्ते मोहम्मद खालिद जीलानी यांनी माहिती अधिकारातंर्गत राज्यसभा सचिवालयाकडे माहिती मागितली होती. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
मल्ल्या राज्यसभेचा खासदार म्हणून मिळणारे दरमहा ५० हजार रुपये वेतन आणि विविध भत्त्यांचे २० हजार रुपये नियमितपणे घेत होता. मल्ल्याने विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवले असून, सध्या परदेशात फरार आहे.
मल्ल्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे. ऐशोआरामी आयुष्य जगणा-या मल्ल्या बद्दलची ही माहिती थक्क करणारी असल्याचे जीलानी यांनी सांगितले. मल्ल्याने हवाई प्रवासाची रक्कम घेतली नाही पण टेलिफोन बिल आणि अन्य भत्ते मात्र घेतले.