सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊ स पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते. जलसंधारणाद्वारे आणखी १५ ते २0 टक्के पाणी वाचविले जाते. बाकी ७0 टक्के पाणी समुद्रात जाते. ही बाब लक्षात घेऊ न, ज्या राज्यांमध्ये सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही, तेथील अर्धवट योजना कार्यान्वित करण्यासाठी वेळापत्रकानुसार धडक कार्यक्रम राबविण्याचा इरादा नितीन गडकरी यांनी सोमवारी बोलून दाखविला.केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारताना गडकरी बोलत होते. या विभागाच्या मावळत्या मंत्री उमा भारती, विद्यमान राज्यमंत्री सत्यपालसिंग व अर्जुन मेघवाल या वेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कोरडवाहू शेतीच्या वेदना विदर्भातील शेतकºयांनी वर्षानुवर्षे झेलल्या आहेत. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्याही दुर्दैवाने याच भागात झाल्या आहेत. महाराष्ट्रात सिंचन व्यवस्थेचे प्रमाण ५0 टक्के असते, तर एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नसती. गेली पंधरा वर्षे जलसंधारणाच्या नेटाने पाठपुरावा करण्यात मी घालविले. मंत्री नसतो, तर बहुदा याच कामासाठी आयुष्य घालविले असते. प्रगत तंत्रज्ञानाने पाणी अडविण्याचे, जिरविण्याचे अनेक प्रयोग राबविता येतात. नदी-नाल्यांच्या रुंदीकरणासह ठिकठिकाणी बॅरेजेस बांधता येतात. वाजपेयींच्या काळात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जलसंसाधन मंत्रालयात बरेच काही करण्यासारखे आहे.राजकीय इच्छाशक्ती असेल, तर सिंचनासह भारताच्या विविध क्षेत्रांत लक्षवेधी बदल घडविता येतील. कामातील अडथळे दूर करून नेटाने ते पूर्णत्वाला नेण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. नमामी गंगे या गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी त्याच इच्छाशक्तीने काम करण्याची माझी तयारी आहे, असे गडकरी म्हणाले.उमा भारतींनी केले कौतुक-उमा भारती म्हणाल्या की, गडकरी पक्षाध्यक्ष असताना भाजपामध्ये माझा पुनर्प्रवेश झाला. गंगा शुद्धिकरण मोहिमेच्या सेलचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपविले. तेव्हापासून या मोहिमेशी मी संलग्न आहे. या विभागाचे मंत्री माझ्याकडे असताना निर्णय घेण्यात गडकरींनी मला मदत केली.त्यामुळेच त्यांच्या योग्य हाती या विभागाचा कार्यभार सोपविताना मला आनंद होत आहे. नमामी गंगे प्रकल्पाची पहिली आहुती मी टाकली आहे. नियोजित वेळेत त्याची पूर्णाहुती नितीन गडकरींच्या हस्ते पडेल, असा मला विश्वास आहे.
गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी जोमाने काम करणार,सिंचनव्यवस्था सुधारण्यास अग्रक्रम : गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:18 AM