ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १६ - छत्तीसगडमधील रायगढ येथील रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे वादग्रस्त व्यंगचित्र छापल्याने वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी बिलासपूरमधील वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्यात आले असून बिलासपूर विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
देशभरात सध्या रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात असून वाहतूक नियमांचे पालन करावे असे संदेश देणारे पोस्टर्स वाहतूक पोलिसांकडून सर्वत्र लावले जातात. छत्तीसगडमधील रायगढमध्येही स्थानिक वाहतूक पोलिस शाखेने पोस्टर्स लावले आहे. बाईक चालवताना हेल्मेटचा वापर करा, तुमची सुरक्षा आमचा संकल्प असा संदेश या पोस्टरवर देण्यात आला खरा मात्र त्यावर एक व्यंगचित्र छापण्यात आले आहे. यामध्ये गडकरींसारखाच दिसणारा व्यक्ती गाडी चालवताना दाखवण्यात आला आहे आणि त्या व्यक्तीने हेल्मेट घातलेले नाही असे चित्रात दाखवण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये एका बाईक रॅलीत गडकरी हेल्मेट न घालताच सहभागी झाली होते. या व्यंगचित्राचा रोख त्या दिशेनेच होता अशी चर्चा रायगढमध्ये सुरु झाली होती. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी हा प्रकार बघितला व त्यांनी संबंधीत दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली. वाढत्या विरोधानंतर रायगढ वाहतूक पोलिसांनी हे पोस्टर्स हटवले आहेत.