गडकरींचे ते विधान काँग्रेसला उद्देशून; भाजपाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:38 AM2019-01-29T03:38:40+5:302019-01-29T03:39:25+5:30
भाजपाचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी म्हटले आहे की, गडकरींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला.
नवी दिल्ली : स्वप्ने दाखविणाऱ्या नेत्याने ती पूर्ण न केल्यास त्याला जनता फटकावून काढते हे उद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसला उद्देशूनच काढले आहेत असे भाजपाने म्हटले आहे. ते विधान मोदी सरकारला उद्देशूनच आहे, अशी चर्चा सुरू होताच भाजपाने हा दावा केला.
यासंदर्भात भाजपाचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी म्हटले आहे की, गडकरींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. काँग्रेसने केवळ गरीबी हटाओच्या घोषणा दिल्या मात्र प्रत्यक्ष त्या दिशेने काहीच कृती केली नाही. राहुल गांधीही आता पोकळ आश्वासनेच देत आहेत.
आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे नितीन गडकरी म्हणाले होते की, स्वप्ने दाखविणारा नेता लोकांना नेहमीच चांगला वाटतो पण ती स्वप्ने प्रत्यक्षात आली नाही, तर तेच लोक त्या नेत्याला फटकावूनही काढतात. गडकरी यांनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून तर केले नाही ना अशी चर्चा रंगली होती.