नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत चोरीचा नवीनच प्रकार आढळून येत आहे. येथील राजौरी गार्डन आणि परिसरातील रहिवाशांच्या चारीचाकी गाडीचे टायर चोरण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. या परिसरातील शानदार व लक्झरीयस गाड्यांच्या चक्क टायरची चोरी होत आहे. विशेष म्हणजे गाडीचे टायर चोरून ती गाडी विटांच्या सहाय्याने जागेवरच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या गँग्ज ऑफ टायरचोरांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
दिल्लीतील गाडीच्या टायर चोरीच्या या घटनेनं खळबळ उडाली असून पोलिसही आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, रातोरात एकाच गाडीचे चारही चाके चोरीला जात आहेत. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आत्तापर्यंत डझनभरपेक्षा जास्त गाड्यांच्या टायरची अशाप्रकारे चोरी करण्यात आली आहे. येथील डीडीए ग्रीन एमआयजी फ्लॅट्समधील रहिवाशी सकाळी सकाळी घरातून बाहेर पडले तेव्हा, गाडीच्या टायर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. कारण, परिसरातील 5 ते 6 गाड्यांच्या टायरची अशाचप्रकारे चोरी झाली होती.
चोरांचा हा कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामध्ये चोर आपल्यासोबत विटा घेऊनच चोरीच्या उद्देशाने येत असल्याचे दिसून येते. तर, गाडीच्या खाली विटा लावून गाडीचे चारही टायर आणि बॅटरी काढून चोर पोबारा करतात. याप्रकरणी पोलिसांना सूचित करण्यात आले आहे, पण अद्याप कुठलिही ठोस कारवाई करण्यात आली नाही.