ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड यांच्याकडून एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना अजून चर्चेत असताना आता पुन्हा एका खासदाराने विमानात गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. यावेळी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदाराचं नाव समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार टीएमसी खासदार डोला सेन आपल्या वृद्द आईची जागा आपातकालीन मार्गासमोर दुस-या बाजूला शिफ्ट करण्यास तयार नव्हत्या. डोला सेन यांनी गोंधळ घातल्यामुळे एअर इंडियाच्या दिल्ली - कोलकाता विमानाला अर्धा तास उशीर झाल्याचा आरोप आहे.
डोला सेन यांची आई व्हिलचेअरवर होती. सेक्युरिटी प्रोटोकॉलनुसार त्या आपातकालीन मार्गाजवळ बसू शकत नव्हत्या. यामुळे जेव्हा केब्रिन क्रूने त्यांची जागा शिफ्ट करण्याची विनंती केली तेव्हा डोला सेन यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात घेतली. या सगळ्या गोंधळामुळे विमानाच्या उड्डाणात 30 मिनिटं उशीर झाला, ज्याचा फटका विमानातील इतर प्रवाशांना भोगावा लागला.
AI staff requested Dola Sen to shift her senior citizen mother's seat from the emergency exit, MP refused and created a ruckus: Sources— ANI (@ANI_news) April 7, 2017
एअर इंडियाने यासंबंधी आपली बाजू मांडत आपल्याला व्हिलचेअरसंबंधी कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती, मात्र बोर्डिंगदरम्यान खासदाराची वृद्द आई व्हिलचेअरवर होती असं सांगितलं आहे.
भाजपा खासदार बाबूल सुप्रियो यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना डोला सेन यांचा बचाव केला आहे. "खासदार सॉफ्ट टार्गेट असतात. अनेकदा लोक आपला संयम गमावतात, तुम्हीही गमावत असालच. त्याचप्रमाणे खासदारही संयम गमावतात आणि चिडतात. संपुर्ण घटना काय आहे कळल्यानंतरच त्यावर भाष्य करणं योग्य ठरेल", असं बाबूल सुप्रियो बोलले आहेत.
#WATCH: BJP MP Babul Supriyo talks on TMC MP Dola Sen, who delayed an AI flight by over 30 minutes, says, "MPs are soft targets." pic.twitter.com/F8EEvAdKPF— ANI (@ANI_news) April 7, 2017
काँग्रेसचे पश्चिम बंगाल युनिटचे महासचिव ओम प्रकाश मिश्रादेखील याच विमानाने प्रवास करत होते. "गैरवर्तनाबद्दल माहित नाही, पण डोला सेन यांनी सहकार्य न केलं नाही, ज्यामुळे विमानाला उशीर झाला" अशी माहिती ओम प्रकाश मिश्रा यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे शुक्रवारीच एअर इंडियाने शिवसेना खासदार यांच्यावर घातलेली विमान प्रवासबंदी उठवली आहे. 23 मार्च रोजी एअर इंडियाच्या कर्मचा-याला मारहाण केल्यानंतर एअर इंडियासहित इतर खासगी विमान कंपन्यांनी त्यांच्या विमान प्रवासावर बंदी आणली होती.