केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतातबांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याची 'भीती' व्यक्त करणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे नेते संतापले आहेत. गजेंद्र सिंह शेखावत शनिवारी (10 ऑगस्ट) जोधपूरला पोहोचले. याच दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जोधपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, काही लोकांनी भारतातबांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होण्याबाबत बोलणं हे दुर्दैवी आहे. बांगलादेशवर विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या वक्तव्याबाबत ते म्हणाले की, हे योग्य नाही. बांगलादेशमध्ये पंतप्रधानांचे निवासस्थान आणि संसद भवनात आंदोलक घुसल्याचे अनेक फोटो समोर आले आहेत.
"हा मोदी सरकारचा भारत"
विरोधी पक्षनेत्यांच्या विधानावर केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, लोक टीका करत आहेत. त्यांनी (विरोधकांनी) समजून घेतले पाहिजे की, हा बांगलादेश नाही, हा मोदी सरकारचा भारत आहे. जर ते असं करत असतील तर भविष्यात त्याचे परिणाम त्यांनाच भोगावे लागतील हे माहीत आहे.
"हे अत्यंत दुर्दैवी आहे"
जया बच्चन यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात वापरलेल्या शब्दांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. पदाचा आदर केला पाहिजे. सभागृहातील कोणतीही व्यक्ती आपल्या वागण्या-बोलण्यातून पदाचा आदर करत नसेल, तर भारतासारख्या परिपक्व लोकशाहीत ते अस्वीकार्य आहे.
दुर्दैवाने अशी घटना घडली तर नक्कीच मन दुखावतं. राजस्थान विधानसभेतील एका नेत्याने या पदाचा आदर केला नाही, हे आम्ही पाहिलं, हे कोणासाठीही कौतुकास्पद नाही. राजस्थान पर्यटन हा राज्य सरकारचा विषय आहे. राज्यघटनेनुसार पर्यटन हा राज्याचा विषय असून मागील सरकारने केलेल्या योजनांतर्गत नुकताच अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता असंही त्यांनी म्हटलं आहे.