नवी दिल्ली: चीन आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन आल्याचं केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जगातील दोन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारयुद्ध पेटलं आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असं शेखावत म्हणाले. शेखावत सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय सोया संमेलनात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध जोरात सुरू आहे. त्यामुळे भारताला निर्यात वाढवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असं शेखावत यांनी म्हटलं. कृषी आधारित उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 'चीन आणि अमेरिकेतील व्यापार युद्ध सुरू असल्यानं भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. सोयाबीनमधून तेल काढण्यात आल्यानंतरही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्यामुळे हे उत्पादन महत्त्वाचं आहे. याशिवाय सोयाबीनपासून तयार केली जाणारी काही उत्पादनं पशुंसाठीदेखील चांगला आहार ठरतात,' असं शेखावत म्हणाले. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. मागील सरकारनं तीळ उत्पादकांचा विश्वासघात केला. त्यामुळे खाद्यतेलासाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावं लागलं, असा आरोप शेखावत यांनी केला. 'परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं चारवेळा आयातशुल्कात वाढ केली. याशिवाय तिळाला मिळणारी किमान आधारभूत किंमतदेखील वाढवली. शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत,' असं शेखावत यांनी सांगितलं.
'चीन-अमेरिकेच्या व्यापारयुद्धामुळे भारताचे अच्छे दिन'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 8:33 PM