उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये बंपर मतदान होण्याची चुणूक आज दिसली. ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघांत विक्रमी ६० टक्क्यांपार मतदान झाले. मतदान उलटून काही तास होत नाहीत तोच उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमचा खेळ सुरु झाला आहे. नंबरप्लेट नसलेल्या गाडीत ईव्हीएम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
हे ईव्हीएम सपाच्या कार्यकर्त्याला मिळाले आहे. या गाडीला नंबरप्लेट नसल्याने या गाडीच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. निवडणूक अधिकारी, पोलीस मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमा झाले आहेत. अज्ञात वाहनात ईव्हीएम सापडल्यानंतर एसडीएस आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. डीएम आणि एसडीएमने ईव्हीएम उघडले आहे. या प्रकरणी जिल्हा अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, हे निवडणूक सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे.
मतदानादरम्यान, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील दुंडुखेडा गावात गरीब मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावू दिला जात नाही, असा आरोप केला होता. अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित जिल्हा दंडाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते.मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कैराना येथे सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कैरानामध्ये 75.12 टक्के मतदान झाले आहे.