नवी दिल्ली : ''तुमच्या डोळ्यास मी डोळे कसे भिडवणार, मी एका गरिब आईच्या पोटी जन्माला आलो, मी कामगार आहे, तुम्ही नामदार आहात. तुमच्या डोळ्यांना डोळे भिडवण्याचे धाडस माझे नाही. काँग्रेसच्या नजरेला नजर मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे काय होते, हे आम्ही पाहिले आहे. आज डोळ्यांबाबत बोलताना जो डोळे मारण्याचा खेळ झाला तो सगळ्या देशाने पाहिला आहे'', असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत राहुल गांधी यांच्या आज सभागृहातील कृतीचा समाचार घेतला. यावेळेस मोदी यांनी बोटांनी डोळे मिचकावण्याची कृती करुन दाखवल्यावर सर्व सभागृहात एकच हशा पिकला.
चीनच्या राजदुताला आधी भेट झाल्याचे टाळले नंतर बिचकत बिचकत स्विकारले हे अत्यंत चूक आहे, प्रत्येक गोष्टीत बालिशपणा करण्याची गरज नाही असा पलटवार मोदींनी केला. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकला जुमला स्ट्राईक म्हणणे कधीही सहन केले जाणार नाही. मला कितीही शिव्या द्या पण भारताच्या सैनिकांचा अपमान सहन करणार नाही असे भावनिक आवाहनही त्यांनी केले. ज्या गोष्टीची माहिती नाही त्या विषयावर बोलल्यामुळे कधीकधी कधी देशाचं नुकसान होऊ शकतं. डोकलाम विषयावरती सर्व देश एकवटला असताना विरोधी पक्षाचे नेते चीनच्या राजदुताबरोबर चर्चा करत होते, असा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली.
राफेल खरेदीबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल यांना प्रत्युत्तर देण्याची संधी सोडली नाही. सत्य चिरडून टाकण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला अशी टीका पंतप्रधानांनी केली. राहुल यांच्या संसदेतील चुकीच्या आरोपावर फ्रान्स सरकारनेही स्पष्टीकरण दिले आहे. कौन कहता है, हमारे पास नंबर नही है या वाक्यातून अहंकार दिसतो, हमारे पास 272 लोग है असे म्हणणाऱ्या लोकांनी 1999 सालीही वाजपेयी यांच्या सरकारला एका मताने पराभूत केले होते. अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली.
18 वर्षंपूर्वी पंतप्रधान वाजपेयी यांच्याकाळात झारखंड, छत्तिसगड, उत्तराखंड या तीन राज्यांची निर्मिती झाली. ही राज्ये अत्यंत उत्तम कारभार करत आहेत. मात्र संपुआ सरकारने आंध्र प्रदेशचे विभाजन करणारे विधेयक संमत करताना राज्यसभेचे दरवाजे बंद करुन जोरजबरजस्तीने विधेयक संमत केले. त्याचे परिणाम आजही आपल्याला भोगावे लागत आहेत. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलगू देसमच्या सदस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. रालोआ सरकार आंध्र प्रदेशातील लोकांच्या इच्छा-अपेक्षांचा सन्मान करत आली आहे. हे सरकार 14 व्या वित्त आयोगाच्या नियमांशी बांधिल असल्यामुळे स्पेशल दर्जाप्रमाणेच स्पेशल पॅकेज देण्यात आले. 4 नोव्हेंबर 2016 रोजी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी हे पॅकेज स्वीकारून केंद्रीय अर्थमंत्र्यांना धन्यवाद दिले होते याचा पुनरुच्चारही केला. टीडीपीने आपल्या अपयशाला झाकण्यासाठी अविश्वास दर्शक ठरावाचा प्रयत्न केला आहे.