अहमदाबाद (गुजरात): राज्यातील राजकोट येथील टीआरपी गेम झोनला लागलेल्या भीषण आगीत गेम झोनचे मालक प्रकाश हिरण यांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सापडलेल्या मृतदेहाचा डीएनए नमुना, अहमदाबादमध्ये राहणाऱ्या प्रकाश यांच्या आई विमला देवी यांच्या डीएनए चाचणीच्या नमुन्याशी जुळला आहे. गेल्या ४-५ वर्षांपासून ते राजकोटमध्ये राहत होते. ५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने तयार करण्यात आलेल्या गेम झोनमध्ये त्यांनी ३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडे गेम झोनची ६०% हिस्सेदारी होती. गेम झोनच्या सहा भागीदारांपैकी एक असलेला आरोपी धवल ठक्कर याला गुजरात पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली.
लोक इतके भाजले की, ओळखही पटेना
गेल्या शनिवारी टीआरपी गेम झोनमध्ये आगीत १२ मुलांसह एकूण ३० जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. काही लोक इतके भाजले की, त्यांची ओळखही पटू शकली नाही.
दिल्लीत अग्नितांडव सुरूच; ५ दुकाने खाक
दिल्लीत बुधवारी पहाटे दिल्लीतील चांदणी चौक परिसरात लागलेल्या आगीत पाच दुकानांचे नुकसान झाले. दुसऱ्या घटनेत, पूर्व दिल्लीच्या मधुविहार भागात मध्यरात्रीच्या सुमारास एका पार्किंगमध्ये लागलेल्या आगीत १७ चारचाकी वाहने जळून खाक झाली. या घटनेमुळे खळबळ उडाली होती.