जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये निर्माणाधीन बोगद्यात काम करणाऱ्या सात जणांचा दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्यात बडगामचे रहिवासी असलेले डॉ. शाहनवाज अहमद डार यांचाही मृत्यू झाला होता. १२ दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचं लग्न झालं आहे. आपल्या लेकीला लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आणण्यासाठी ते तिच्या सासरी जाणार होते. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली. डॉक्टर शाहनवाज यांच्या मुलाने सांगितलं की, त्यांचे वडील सहा दिवसांपूर्वीच हे काम करण्यासाठी गेले होते.
डॉक्टर शाहनवाज यांचं पार्थिव सोमवारी बडगामच्या नदीगाम गावात पोहोचलं तेव्हा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण गाव जमा झालं. त्यांची मुलगीही घरी पोहोचली होती. वडील आपल्याला माहेरी घेऊन जाण्यासाठी येतील याची ती वाट पाहत होती. १२ दिवसांपूर्वीच मुलीचं लग्न झालं होतं. या घटनेमुळे कुटुंबीयांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
गावातील लोक डॉक्टर शाहनवाज यांना देवासमान मानायचे. खरंतर त्यांचा स्वभाव खूप चांगला होता आणि या गावात ते एकमेव डॉक्टर होते, जे लोकांवर उपचार करायचे. डॉक्टरांचा मुलगा मोहसीनने सांगितलं की, सहा दिवसांपूर्वीच गांदरबलच्या बोगद्यातील कामगारांवर उपचार करण्यासाठी पप्पांना ठेवण्यात आलं होतं कारण तेथे दुसरा डॉक्टर नव्हता.
"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आर्किटेक्ट शशी भूषण अबरोल यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पत्नीने करवाचौथचा उपवास ठेवला होता आणि ती व्हिडीओ कॉल करत होती, मात्र शशी यांनी फोन उचलला नाही. याच दरम्यान ५-६ वर्षांची मुलगी आजतकवर रडत म्हणाली की, "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं."