मुंबई - लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत गांधी घरण्यावर टीका करताना दिसले. एवढच काय, अनेक सभांमध्ये मोदींनी गांधी घरणाऱ्याला आणि काँग्रेसला देशातून हद्दपार करा, असे आवाहन केले होते. त्यात मोदींना काही प्रमाणात यशही आले. सलग दुसऱ्यांदा मोदींनी एनडीएला विजय मिळवून देत काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेतेपदासाठी झुरण्यास भाग पाडले. परंतु, विरोधातील गांधी घराण्यावरील राग मोदी स्वपक्षातील गांधी घराण्यावरही काढत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
सलग दुसऱ्यांदा दारुण पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. या पराभवाची जबाबदारी राहुल गांधी यांनी घेतली असून पक्षाकडे पदाचा राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे गांधी घराण्याव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. या घडामोडींमुळे राजकारणातील गांधी घराण्याचे वर्चस्व कमी करण्याचा मानस मोदींचा काही प्रमाणात यशस्वी झाला, अस म्हणायला हरकत नाहीत. मात्र मोदींच्या धोरणापुढे स्वपक्षातील गांधी घराणं दुर्लक्षीत झालं आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये असलेल्या मनेका गांधी यांच्याकडे २०१४ मधील मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची जबाबदारी होती. यावेळी मात्र त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर त्यांचे चिरंजीव वरुण गांधी यांना देखील कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्या मतदार संघांची अदलाबदली करण्यात आली होती.
दरम्यान वरुण गांधी आणि मनेका गांधी यांच्यापैकी कुणालाही मंत्रीमंडळात स्थान मिळाले नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधातील गांधी घराण्यासह स्वपक्षातील गांधी घराण्यावर सपशेल फुली मारली का, असा प्रश्न मनेका गांधी यांच्या समर्थकांना पडला आहे.