नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय पक्षावर सोडून दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गांधी कुटुंब संपूर्णपणे या निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी अमेरिकेला जाणार आहे. पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी या रॉबर्ट वाड्रा यांच्या उपचारासाठी आधीच अमेरिकेला गेल्या आहेत. त्यामुळे गांधी कुटुंबाच्या गैरहजेरीत काँग्रेस पक्षाच्या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
राहुल गांधी यांनी बुधवारी पत्र लिहून काँग्रेस अध्यक्षपदाचा कारभार सोडला आहे. मी काँग्रेस अध्यक्ष नाही असं राहुल यांनी सांगितले. तसेच सोशल मिडीयातील ट्विटर, फेसबुकवरुनही राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष उल्लेख काढून टाकला आहे. राहुल गांधी यांनी पत्रात नमूद केलं आहे की, काँग्रेस पक्षासाठी काम करणे माझ्यासाठी सन्मानाचे होते. काँग्रेस पक्षाची विचारधारा नेहमी भारतासारख्या सुंदर देशाची सेवा करण्यासाठी बनलेली आहे. मी पक्षाच्या अध्यक्षांच्या रुपाने लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. पक्षाला भविष्यात पुढे जाण्यासाठी या पराभवाची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. यामुळे मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व गांधी कुटुंबाशिवाय अन्य व्यक्तीनी करावं. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी. मी अध्यक्ष निवडणे योग्य राहणार नाही. पक्ष योग्य व्यक्तीला पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्त करेल असा विश्वास मला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षाची निवड लवकरात लवकर करावी.
राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा मागील कार्यकारणी बैठकीत स्वीकारला नसला तरी राहुल गांधी यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनानंतर पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारणीची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या पुढील अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाची शिफारस केली जावी यासाठी चर्चा होईल.
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, अद्याप नव्या अध्यक्षांची निवड झाली नाही. त्यामुळे राहुल पुन्हा सक्रीय होतील, असा कयास लावला जात होता. तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांमध्येही अध्यक्षपदावरुन काही नावांची कुजबुज सुरू होती. या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या पक्षातील चर्चेत राहुल यांनी निर्णयावर कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.