नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या, जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या, सत्याग्रहाच्या मार्गानं बलाढ्य शत्रूला नमवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची आज १५० वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे पुत्र अनिल शास्त्री यांनीदेखील महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केलं. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज देशभरात काँग्रेस आणि भाजपानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काँग्रेसकडून आज देशाच्या विविध भागांमध्ये पदयात्रा काढण्यात येणार आहेत. यापैकी दिल्लीतल्या पदयात्रेचं नेतृत्व सोनिया गांधी करतील. तर महासचिव प्रियंका गांधी लखनऊमधल्या, राहुल गांधी वर्ध्यातल्या पदयात्रांचं नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधींच्या आदरांजली वाहून त्यांच्या दिवसाची सुरुवात केली. थोड्याच वेळात ते लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी विजयघाटला जातील. आज लालबहादूर शास्त्रींची ११५ वी जयंती आहे. यानंतर पंतप्रधान संसदेत जातील. तिथे दोन्ही नेत्यांच्या प्रतिमांना वंदन करतील. यानंतर मोदी साबरमती आश्रमाला भेट देण्यासाठी अहमदाबादला रवाना होतील. २०१४ मध्ये २ ऑक्टोबरला मोदींना स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. याच अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आज मोदी सहभागी होतील.