गांधी, नेहरू, आंबेडकर अनिवासी भारतीय होते, काँग्रेस ही NRI ची चळवळ - राहूल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 04:23 PM2017-09-22T16:23:37+5:302017-09-22T16:26:35+5:30
काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत
नवी दिल्ली - काँग्रेस हा पक्ष अनिवासी भारतीयांच्या चळवळीतून जन्माला आला असून महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू व बाबासाहेब आंबेडकर हे एनआरआय किंवा अनिवासी भारतीय होते असे उद्गार राहूल गांधी यांनी अमेरिकेत काढले आहेत. मूळातली काँग्रेसची चळवळ ही अनिवासी भारतीयांनी केली होती असे ते म्हणाले.
न्यू यॉर्कमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनिवासी भारतीयांच्या मेळाव्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी बोलत होते. सध्या ते दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या थोर नेत्यांपैकी प्रत्येकजण जग फिरले, त्यांनी जगाचा अनुभव घेतला आणि ते भारतात परत आले आणि बाहेरच्या जगातून शिकलेल्या कल्पनांमधून त्यांनी भारतात परीवर्तन घडवलं असे गांधी म्हणाले.
अशा हजारो अनिवासी भारतीयांनी या देशासाठी योगदान दिले आहे परंतु त्यांची दखल घेतली गेली नसल्याचे ते म्हणाले. श्वेत क्रांतीच्या वर्गिस कुरीयन यांचा दाखला देत ते ही अनिवासी भारतीय होते असा दाखला त्यांनी दिला. भारतातल्या सगळ्यात मोठ्या यशापैकी दुग्ध क्रांती एक आहे जी कुरीयन या एनआरआयनं घडवली आहे असं ते म्हणाले. कुरीयन अमेरिकेतून आले आणि त्यांनी क्रांती केल्याचे त्यांनी सांगितले.
तुम्ही विदेशात स्थायिक झालात याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मूळ देशासाठी काही करू शकत नाही असे सांगत असे एनआरआय तर देशाच्या पाठिचा कणा असल्याचे प्रशंसोद्गार राहूल यांनी काढले. अमेरिकेमध्ये असं बघायला मिळतं, की सगळीकडे भारतीय काम करतात. ते अमेरिकेसाठीही काम करतात आणि भारतासाठीही काम करतात. ते अमेरिकेलाही मोठं करतात आणि भारतालाही मोठं करतात. काही जणं भारताला भौगोलिकदृष्ट्या बघतं, परंतु मी भारताला कल्पनांचा संच या दृष्टीने बघतो असं ते म्हणाले. जो कुणी भारतासाठी चांगल्या कल्पना अमलात आणतो तो भारतीय असं त्यांनी सांगितलं.
भाजपाचा उल्लेख न करता, राहूल म्हणाले सगळीकडे लोकं मला विचारतात की भारत सहिष्णू म्हणून ओळखला जायचा आता ती ओळख कुठे आहे? भारतातल्या एकोप्याचं काय झालं? असं विचारत भारतामध्ये दुहीचं राजकारण सुरू असल्याचे राहूल म्हणाले.