भोपाळ - मध्य प्रदेशमधील एका शेतकऱ्याने लाचखोर तहसिलदारास चांगलाच धडा शिकवला आहे. आपल्या शेत जमिनीचे नामांतरण करण्यासाठी या शेतकऱ्याकेड तहसिलदाराने चक्क 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत शेतकऱ्यांने चक्क आपली म्हैसच तहसिलदाराच्या जीपला बांधली. गरीब शेतकऱ्याच्या या गांधीगिरीमुळे तहसिलदाराची लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे.
लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात संजय दत्त रेडिओ जॉकी बनून पीडित आणि दु:खी लोकांचे मोटीव्हेशन करत असतो. तसेच अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गही सूचवत असतो. अगदी, चित्रपटात संजूबाबाने सांगितलेल्या गांधीगिरीटाईप या शेतकऱ्याने तहसिलदारला धडा शिकवला आहे. चित्रपटात पेन्शनच्या पैशासाठी लाच मागितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यासमोर आपले कपडे उतरवत प्रत्येक वस्तूचा हिशेब देणारे गरीब आजोबा आपण पाहिले आहेत. आता, मध्य प्रदेशमधील एका गरीब शेतकऱ्यानेही तशीच गांधीगिरी केल्याचं पाहायला मिळालं.
जमिनीचे नामांतरण (खातेफोड) करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे चक्क एक लाख रुपयांची लाच मागितली. या शेतकऱ्याने तहसिलदारांना 50 रुपये दिले. मात्र, उर्वरीत 50 हजार रुपये दिल्याशिवाय काम करत नसल्यामुळे शेतकऱ्याने चक्क 50 हजार रुपयांच्या बदल्यात आपली म्हैसचं तहसिलदाराच्या जीपला बांधली. त्यानंतर, तहसिलदाराला काय करावे हेच कळेना. त्यामुळे लवकरच काम करतो, असे आश्वासन तहसिलदाराने दिले. तसेच पोलिसांना बोलावून ती म्हैसही घेऊन जाण्यास बजावले. त्यावर, पोलिसांनी जीपला बांधलेली म्हैस सोडवून एका झाडाला बांधली. त्यामुळे तात्पुरती तहसीलदाराची सुटका झाली. पण, या घटनेची वाच्यता सर्वत्र झाली असून या जीपचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तहसिलदारांपुढे यक्षप्रश्न उभा राहिला. तसेच ही बातमी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी एसडीएसकडे याबाबत विचारणा करत अहवाल मागितला आहे.
देवगाव येथील शेतकरी लक्ष्मण यादव यांच्याबाबत ही घटना घडली असून खरगापूरचे तहसिलदार चौकशीच्या फेऱ्यात चांगलेच अडकले आहेत. दरम्यान, याप्रकरणी बलदेवगडच्या एसडीएम वंदना राजपूत यांनी चौकशी सुरू केली असून तहसिलदार सुनिल वर्मा दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही राजपूत यांनी दिले आहेत.