नवी दिल्ली : भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. आपल्या आयुष्यावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे, असे ओबामा नेहमी म्हणतात. देशात येताच त्यानी सर्वप्रथम शांततेच्या या दूताच्या राजघाटावरील स्मारकास भेट दिली. स्मारकावर पुष्पचक्र वाहिले आणि गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण केली. हात जोडून ते स्मारकासमोर नतमस्तक झाले. महात्मा गांधीजी ही जगाला मिळालेली मौल्यवान भेट होती, असे उद्गार भाववश झालेल्या ओबामांनी काढले. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) म्हणत असत, गांधीजींची विचारधारा अजूनही भारतात जिवंत आहे आणि जगासाठी ही दुर्मीळ भेट आहे. प्रेम आणि शांतता ही मूल्ये जगातील सर्व लोक व सर्व देशांत अस्तित्वात राहावीत, असे ओबामा यांनी येथील वहीत लिहिले आहे. आज राष्ट्रपती भवनात ओबामा यांच्या भव्य स्वागताचा सोहळा पार पडला, त्यानंतर ओबामा थेट राजघाटावरील गांधीजींच्या समाधीजवळ आले. २०१० साली भारत भेटीतही त्यांनी या स्मारकाचे दर्शन घेतले होते. या वेळी ओबामा यांना त्यांची सर्वाधिक प्रिय व्यक्ती कोण, असे विचारण्यात आले होते. जिवंत वा मृत व्यक्तीचे नाव त्यांना सांगायचे होते. त्या वेळी ओबामा यांनी गांधीजी आपल्याला सर्वाधिक प्रिय आहेत, असे म्हटले होते. गांधीजींकडून मला प्रेरणा मिळते, गांधीजींनी डॉ. मार्टिन ल्युथर किंग (ज्यु) यांनाही प्रेरणा दिली. भारतात ‘असहकार’ची चळवळ झाली नसती तर अमेरिकेतही ती झाली नसती, असे ओबामा म्हणाले.
गांधीजी जगाला मिळालेली मौल्यवान भेट
By admin | Published: January 26, 2015 4:32 AM