अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी (30 मार्च) लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपाचा पारंपरिक मतदार संघ असलेल्या गांधीनगरमधून शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भव्य रॅली देखील काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रामविलास पासवान, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाशसिंह बादल, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अमित शहा यांनी सभेला सुरुवात केली. या सभेला एनडीए घटकपक्षांचे सर्व नेते उपस्थित होते. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. त्यानंतर चार किमीचा भव्य रोड शो करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातीच आपला देश सुरक्षित राहू शकतो असं म्हणत पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. तसेच देशाचं नेतृत्व कोण करणार या एकाच मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
...अन् अमित शहा नातीपुढे हरले; भाजपाच्या टोपीने केली आजोबांची फजितीदिग्गज नेत्यांची उपस्थितीत असताना अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया एका गंमतीदार घटनेमुळे चर्चेत आली आहे. अमित शहा यांची रॅली सुरू असताना त्यांची नात देखील तिथे उपस्थित होती. उन्हापासून वाचविण्यासाठी नातीला टोपी घालण्यात आलेली होती. यावेळी भाजपाची रॅली असल्यामुळे अनेकांनी भाजपाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्याचवेळी शहा यांच्या कडेवर असलेल्या नातीच्या डोक्यातील आधीची टोपी काढून भाजपाची टोपी घालण्यात आली. परंतु, त्यांच्या नातीला भाजपाची टोपी आवडली नाही. तिने भाजपाची टोपी दोन-तीन वेळा काढून टाकली. तसेच आपली आधीची टोपी घालणेच पसंत केले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
तुमचा नेता कोण? उद्धव ठाकरेंचा महाआघाडीला सवालएनडीएविरोधात महाआघाडी करणाऱ्या विरोधकांचा नेता कोण, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आमचा नेता एक आहे. विरोधकांनी त्यांचा नेता कोण ते एकदा सांगावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी भाजपाकडून रोड शो करण्यात आला. या रोड शोआधी एनडीएच्या नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी उद्धव यांनी महाआघाडीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणावेळी उपस्थितांनी 'मोदी, मोदी' अशी घोषणाबाजी सुरू केली. त्यावेळी आमचा नेता एक आहे. पण महाआघाडीचा नेता कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'आमच्या रॅलींमध्ये मोदींच्या नावानं घोषणाबाजी होते. विरोधकांनी त्यांची एक रॅली काढून दाखवावी आणि त्यावेळी तिथे जमलेल्यांना एका व्यक्तीच्या नावानं घोषणा द्यायला सांगाव्यात,' असं आव्हान उद्धव यांनी दिलं. महाआघाडीतील पक्षांच्या, नेत्यांच्या विचारात साम्य नाही. कायम एकमेकांचे पाय खेचणारे नेते आज एकत्र आले आहेत. त्या सर्वांनाच पंतप्रधान व्हायचं आहे, अशी टीका उद्धव यांनी केली.