Ganesh Chaturthi 2018 : सुखकर्ता दुखहर्ता असलेल्या गणेशाचं आगमन होणार आहे. घराघरांतही बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू झाली आहे. कोणतही शुभ काम करण्याआधी बाप्पाची पूजा करण्यात येते. सुख देणारा आणि दुःख हरणारा अशा शब्दांत बाप्पाची स्तुती करण्यात येते. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरांमध्ये गणेश भक्तांची रांग पाहायला मिळते. यावर्षी 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या दिवशी बाप्पा आपल्या भक्तांसाठी आपल्या आसनावर विराजमान होणार आहे. तसं पाहायला गेलं तर गणपतीची मंदिरं संपूर्ण देशभरात आढळून येतात. पण त्यातल्यात्यात काही अशीही मंदिरं आहेत जी सर्वात प्राचीन आणि वैशिष्टपूर्ण आहेत. जाणून घेऊयात अशा काही मंदिरांबाबत जी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहेत.
1. सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
संपूर्ण मुंबइकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायकाची महती संपूर्ण जगभरात चर्चीली जाते. या मूर्तीची सोंड डाव्या बाजूला असून ती सिद्धपीठाला जोडलेली आहे. त्यामुळे आपल्या वेगळेपणासाठी हे मंदिर ओळखलं जातं.
2. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर, पुणे
संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर संपूर्ण जगभरात आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे. वर्षभर अनेक भाविकांची या ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी रांग लागलेली असते. या मंदिरात देवाला अनेक मिठायांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेकदा या मंदिराची आरासही मिठाया किंवा फळांनी करण्यात येते.
3. मोती डूंगरी गणेश, जयपुर
हे मंदिर जयपूरमधील काही प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर सातशे ते आठशे वर्ष जुनं असल्याचा येथील लोकांकडून दावा करण्यात येतो. असं म्हटलं जातं की, या मंदिरातील श्रीगणेशाची मूर्ती नरेश माधोसिंह यांची राणी आपल्या माहेराहून 1761 साली घेऊन आली होती. ही मूर्ती राणीच्या माहेरच्यांनी गुजरातवरून आणली होती आणि त्यावेळी ती पाचशे वर्ष जुनी होती. या मंदिरात आजही गणेश चतु्र्थीच्या दिवशी भाविकांची गर्दी असते.
4. रणथंभौर गणेश , राजस्थान
रणथंभौरमधील गणपतीचं मंदिर जवळपास 100 वर्ष जुनं आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे, येथे गणपतीची तीन डोळ्यांची प्रतिमा असून ती शेंदूर लावलेला आहे. गणपतीचं हे रूप पाहण्यासाठी फार लांबून लांबून लोकं येतात.
5. कनिपक्कम विनायक मंदिर, चित्तूर
आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यामध्ये असलेलं कनिपक्कम मंदिर फार प्राचीन आहे. असी मान्यता आहे की, या मंदिराची स्थापना 11व्या शतकामध्ये झाली होती. या मंदिराबाबत सर्वात रोचक गोष्ट म्हणजे या मंदिरात असलेल्या गणपतीचा आकार दिवसेंदिवस वाढत जात आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की, या मंदिरातील मूर्ती आधी छोटी होती त्यानंतर हळूहळू त्याचा आकार वाढू लागला.