भावनगर - डॉक्टर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गणेशने आता त्याच्या ध्येय्याच्या दिशेने चालताना एक पाऊल पुढे टाकले आहे. 3 फूट उंची आणि 14 किलो वजन असल्याने 17 वर्षीय गणेशला एमबीबीएससाठी प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, हिम्मत न हारता, गणेशने सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर, गणेशला एमबीबीएसला प्रवेश मिळाला आहे.
गुजरातच्या सौराष्ट्र प्रदेशातील भावनगर येथील गणेश बारैय्यावर जणू काळानेच कोप केला. त्यामुळे लहानपणापासूनच त्याची उंची, वजन वयानुसार वाढलेच नाही. 17 वर्षीय गणेशची शारीरिक वाढ खुंटली. शेतकरी मजुराच्या घरात वाढलेला गणेश 6 बहिणींमध्ये एकुलता एक भाऊ आहे. बालपणापासूनच त्याने डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यादृष्टीने प्रयत्नही केलं. त्यामुळेच NEET परीक्षेत गणेशने 233 चा स्कोर मिळवला. मात्र, अॅडमिशन कमिटीने गणेशला मेडिकलसाठी प्रवेश नाकारला. तुझे वजन आणि उंची खूपच कमी आहे. तसेच तू 72 टक्के अपंग आहेस. त्यामुळे इमर्जंन्सी केसमध्ये तू ऑपरेशन करु शकत नाही, असा अजब-गजब तर्कही अॅडमिशन कमिटीने दिला होता. मात्र, पठ्ठ्याने हार न मानता कायदेशीर मार्गाने आपली लढाई सुरू केली. विशेष म्हणजे या लढाईत गणेशने विजयही मिळवला.
शेतमुजराचा मुलगा गणेश
गणेशचे आई-वडिल शेतात मोलमजुरी करतात. त्यामुळे आर्थिक दृष्ट्याही गणेशची परिस्थिती नाजूक आहे. मात्र, आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करुन गणेशने बाळगलेल्या जिद्दीमुळे नीलकंठ विद्यापीठ तडाजाचे संचालक दलपत भाई कातरिया आणि रैवतसिंह सरवैया यांनी गणेशला मदत केली. गणेशला न्याया देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. पण, दुर्दैवाने येथेही गणेशची पाठ सोडली नाही. उच्च न्यायालयात गणेशविरुद्ध निर्णय देण्यात आला. तरिही, गणेश खचला नाही, गणेशने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली.
सर्वोच्च न्यायालयात गणेशने लढाई जिंकली
गणेशने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर तशाच प्रकरणातील आणखी दोघेजण न्याय मागण्यासाठी तेथे आले होते. त्यामुळे गणेशसोबत आणखी दोघांना एकत्र येऊन तिघांनी सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. यावेळी निर्णय या तिघांच्या बाजुने लागला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवत गणेशच्या बाजुने निर्णय दिला. कुठल्याही विद्यार्थ्याला केवळ उंची आणि वजन कमी असल्याने शिक्षण नाकारता येणार नाही, असा निर्णय देत गणेशला मेडिकल प्रवेश देण्याचा आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे, आता गणेशचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल.