पाटणा : बिहार राज्य शिक्षण मंडळाने (बीएसईबी) बारावीतील कला शाखेत सर्वोच्च गुण मिळवलेल्या गणेश कुमार याचा निकाल शुक्रवारी रद्द केला. बनावट कागदपत्रांच्या प्रकरणात त्याला अटक केली, असे मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. चीट फंड कंपनीत त्याने १५ लाख रुपयांचा गैरव्यवहारही केला आहे. कुमारने त्याचे वय ४२ असताना २४ असल्याचे कागदपत्रांत नमूद केले होते. जन्माचा बनावट दाखला सादर करून त्याने बारावीची परीक्षाही दिली, असे मंडळाचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी प्रसारमाध्यमांना येथे रविवारी सांगितले. किशोर म्हणाले की, ‘गणेश कुमार याचा निकाल मंडळाने रद्द केला असून, त्याच्याविरोधात प्रथम माहिती अहवाल दिला आहे. बारावी परीक्षेतील निकालातील विसंगतींबद्दल बिहार इंटरमिजिएट कौन्सिलच्या येथील कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी निदर्शने केल्यानंतर ही कारवाई झाली. (वृत्तसंस्था)गणेश कुमारने त्याचे मूळ वय परीक्षेच्या अर्जात नमूद केले नाही. तो दोन मुलांचा बाप आहे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गणेश कुमारने दहावीची परीक्षा दिली आणि खरे वय कमी दाखवण्यासाठी १२ वीची परीक्षा दिली. मंडळाने त्याचा दहावीचा तसेच बारावीचा निकाल रद्द केला आहे. बारावीचा निकाल या आठवड्यात जाहीर होताच गणेश कुमार हा कला शाखेत सर्वाधिक गुण मिळवणारा ठरला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी त्याची शैक्षणिक पात्रता व क्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित केले होते.पाटणाचे उपपोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी गणेश कुमारच्या चौकशीनंतर सांगितले की, तो कोलकाता येथील चीट फंड कंपनीत १५ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याबद्दल दोषी ठरला आहे. झारखंडमधील गिरीध येथे गणेश कुमार या कंपनीचा कर्मचारी होता. या कंपनीच्या वतीने त्याने लोकांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी लोकांकडून दडपण वाढताच तो २०१३ मध्ये पाटण्याहून पळाला, असेही महाराज म्हणाले. त्याच्या विरोधात फसवणुकीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत.———————
टॉपर घोटाळ्यातील गणेशकुमारचा १५ लाखांचा गैरव्यवहार
By admin | Published: June 05, 2017 4:04 AM