नवी दिल्ली - गणेशोत्सव आणि आगामी सण-उत्सावाला जमणाऱ्या गर्दीबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. सण उत्सवातील गर्दीमुळे कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा करोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत.
सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उदभवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल इशारा देताना म्हणाले कि, “जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, सगळे कष्ट व्यर्थ जातील”.
पॉल यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत विधान करताना म्हटले की, अद्यापही दुसरी लाट संपलेली नाही. आता सण उत्सव येत आहेत. अशात मोठ्या संख्येत लोकांनी जमा होऊ नये. आजही मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहे. सर्वांच्या हितासाठी सण घरातच साजरे करावेत, असा सल्लाही पॉल यांनी दिलाय.
यापूर्वीही दिला होता सल्ला
डॉ. व्ही. के. पॉल यांनी यावेळी लसीकरणासाठी महिलांना पुढे येण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, “महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची आहे.” यावेळी ते असंही म्हणाले कि, “ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा.” नीती आयोगाने करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत याआधीच इशारा दिला आहे.