ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. १३ - मेरठमधील तरुणीवरील सामूहिक बलात्कार व जबरदस्तीने धर्मांतर या प्रकरणाने सोमवारी नवीन वळण घेतले आहे. 'राजकीय नेत्यांनी कुटुंबाला पैसे दिल्यानेच ही खोटी तक्रार दिली होती' असा जबाब पिडीत तरुणीने स्थानिक दंडाधिका-यांसमोर दिला असून कुटुंबीयांपासूनच जीवाला धोका आहे असे त्या तरुणीने म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये मेरठमधील खरखौडा येथील एका तरुणीने पोलिसांकडे सनौल्लाह, नवाब आणि अन्य दोघा जणांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला होता. बलात्कारानंतर नराधमांनी जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला असे तिने तक्रारीत म्हटले होते. या घटनेनंतर देशभरात 'लव्ह जिहाद' हा नवीन वाद निर्माण झाला होता. मात्र घटनेच्या दोन महिन्यांनी या प्रकरणाने नवीन वळण घेतले. सोमवारी पिडीत तरुणीने घरातून पळ काढून पोलिस ठाणे गाठले व कुटुंबाविरोधातच तक्रार केली. 'मी स्वेच्छेनेच सनौल्लाहसोबत गेली होती, माझ्यासोबत सामूहिक बलात्कारही झाला नाही आणि माझे धर्मपरिवर्तनही झालेले नाही' असा जबाब या तरुणीने पोलिसांना दिला. 'माझ्या कुटुंबाला काही नेत्यांनी पैसे दिले होते व म्हणून सामूहिक बलात्कार व धर्मपरिवर्तन हे आरोप केले गेले असा दावाही तिने केला आहे. कुटुंबापासून माझ्या जीवाला धोका असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांप्रमाणेच तरुणीने दंडाधिका-यांसमोरही हाच जबाब दिला असून यानंतर तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. पैसे देणारे नेते कोण हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, पिडीत मुलीचे कुटुंबीय याविषयी म्हणाले, काल दुपारी आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला व तरुणीला धमकावले होते व आज सकाळी तीच लोक तरुणीला पोलिस ठाण्यातही घेऊन गेले होते. या नवीन खुलाश्यानंतर उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरणही तापले आहे. भाजपनेच याप्रकरणाचा अपप्रचार केला असा दावा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी दिला. तर भाजपनेही कायदा आपले काम करेल अशी सावध भूमिका घेतली.