नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं देशवासीयांनी अनेक आश्वासनं दिली होती. यातील एक आश्वासन गंगा नदीच्या स्वच्छतेचं होतं. मात्र 2019 ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असतानाही गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. वर्ल्ड वाईड फंडच्या (डब्ल्यूडब्ल्यूएफ) अहवालानुसार, गंगा ही जगातील सर्वात संकटग्रस्त नद्यांपैकी एक आहे. भारतातील बहुतांश नद्या ओला आणि सुका दुष्काळ अनुभवतात. गंगादेखील त्याला अपवाद नाही. देशात दोन हजार एकाहत्तर किलोमीटर वाहणारी गंगा नदी उत्तराखंडमध्ये उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या गंगा नदीमुळे 10 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रावरील शेती फुलते. मात्र प्रदुषणामुळे गंगा नदीची अवस्था अतिशय वाईट आहे. गंगा नदी ऋषिकेशपासूनच प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. गंगा नदी ज्या भागातून वाहते, त्या भागातील बहुतांश ठिकाणी शौचालयांची स्थिती दयनीय आहे. अनेक ठिकाणी लोक उघड्यावर शौचास जातात. यामुळे नदी प्रदूषित होते. कानपूरपासून 400 किलोमीटर अंतरावर गंगा नदी सर्वाधिक प्रदूषित आहे. ऋषिकेशपासून कोलकात्यापर्यंत गंगा नदीच्या किनाऱ्यांवर अनेक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमधील रसायनयुक्त पाणी थेट गंगा नदीत सोडलं जातं. त्यामुळे प्रदुषणात आणखी भर पडते. याशिवाय अनेक कारखान्यांमधील प्रदूषित पाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय थेट नदीत सोडलं जातं. त्यामुळे जीवनवाहिनी समजली जाणारी गंगा नदी प्रचंड प्रदूषित झाली आहे. गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधून वाहते. या सर्वच राज्यांमध्ये नदीची स्थिती अतिशय वाईट आहे.
गंगा जगातील सर्वात प्रदूषित नदी; अहवालातून धक्कादायक वास्तव पुन्हा समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 11:40 AM