देहराडून - भारतीय जनमानसात गंगा नदीचे महात्म्य अनन्यसाधारण आहे. मात्र देवीचा दर्जा असलेली गंगा नदी विविध कारणांमुळे प्रदूषित झाली आहे. अनेक योजना आणि कोट्यवधी रुपये खर्च करूनही अद्याप गंगा नदी स्वच्छ झालेली नाही. उलट गंगेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता 50 वर्षांपूर्वी हरवलेल्या किरणोत्सारी प्लुटोनिमच्या उपकरणामुळे गंगा प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सत्पाल महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत 1965 साली अयशस्वी ठरलेल्या नंदादेवी अभियानाचा उल्लेख करत गंगेच्या प्रदूषणामागील संभाव्य कारणांपैकी हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. 1965 साली अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयए आणि भारताची गुप्तहेर संस्था आयबी यांनी चीनवर नजर ठेवणयासाठी नंदादेवी शिखरावर परमाणू संचालित हेरगिरी यंत्र स्थापन करण्यासाठी गुप्त मोहीम राबवली होती. मात्र या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. त्यामुळे पुन्हा कधीतरी प्रयत्न करण्याच्या इराद्याने शास्त्रज्ञ अणुइंधनावर चालणारा जनरेटर आणि प्लुटोनियम कॅप्सूल तिथेच सोडून माघारी परतले. मात्र शास्त्रज्ञांनी मोहीम पुन्हा सुरू करून ते त्या ठिकाणी गेले असता जनरेटर आणि प्लुटोनियम कॅप्सुल हरवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्लुटोनियम कॅप्सुलचे वयोमान 100 वर्षांहून अधिक असते, त्यामुळे ही कॅप्सुल बर्फात दबलेली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, ही गंभीर बाब असल्याचे सांगत सत्पाल महाराज यांनी सक्रीय प्लुटोनियममधून किरणोत्सर्ग होण्याची भीती मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान व्यक्त केली. या प्लुटोनियममुळे नंदादेवी पर्वत रांगांमधून गंतेत येणाऱा बर्फ प्रदूषित होत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच या प्रकरणी अभ्यास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सत्पाल महाराज यांनी मोदींकडे केली.
50 वर्षांपूर्वी हरवलेल्या प्लुटोनियममुळे होत आहे गंगा प्रदूषित ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 1:00 PM