नवी दिल्ली : जगात नद्यांमधून सर्वाधिक लांबीची सफर करणारी ‘गंगा विलास’ ही क्रूझ केंद्र सरकार सुरू करणार आहे. १० जानेवारीला वाराणसी येथून निघालेली ही क्रूझ बांगलादेशच्या हद्दीतूनही प्रवास करून, तसेच विविध पर्यटनस्थळांना भेट देत आसामच्या दिब्रूगढपर्यंत जाणार आहे. क्रूझ ५० दिवसांत चार हजार किमीचा पल्ला गाठेल. जलमार्गाद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे, जलमार्ग खात्याचे मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले की, गंगा विलास ही क्रूझ आपल्या जलमार्गातील ५०हून अधिक पर्यटनस्थळांना भेट देणार आहे.
गंगा, ब्रह्मपुत्रामधून प्रवासगंगा विलास क्रूझ गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांतून प्रवास करणार आहे. तिच्या सफरीचे वेळापत्रक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी वाराणसी येथील रविदास घाट येथे जाहीर केले. १० जानेवारीला वाराणसी येथून गंगा विलास क्रूझचा सुरू झालेला प्रवास १ मार्चला दिब्रुगढ येथे संपेल. वाराणसी येथून ही क्रूझ आठव्या दिवशी पाटणा येथे पोहोचेल. तिच्यातून पर्यटक बक्सर, रामनगर, गाझीपूर असा प्रवास करीत, महत्त्वाची पर्यटन व वारसा स्थळे पाहात आसाममधील दिब्रुगढला पोहोचतील. जगातील सर्वांत मोठे तिवराचे जंगल आसाममधील मेयाँग येथे आहे. तिथेही हे पर्यटक भेट देणार आहेत. गंगा विलास क्रूझ ही नदीमार्गे खूप दूरच्या प्रवासासाठी निघणारी व भारतातच बनविलेली पहिली क्रूझ आहे. ही क्रूझ यात्रा सुरू करण्यासाठी इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयडब्ल्यूएआय), अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझेस, जे. एम. बक्षी रिव्हर क्रुझेस या तिघांमध्ये एक करार झाला आहे.