ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 31 - आपली पत्रं पोहोचवणारे पोस्टमन काका आता काही दिवसानंतर घरोघरी गंगाजलदेखील पोहोचवताना दिसू लागतील. हरिद्वार आणि ऋषिकेशमधून गंगाजल लोकांच्या घरी पोहोचावं यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचललं असून केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी याबबतची माहिती दिली आहे. गंगाजल लोकांच्या घरी पोहोचवण्यासाठी पोस्टमनची मदत घेण्यात येणार असून याव्यतिरिक्त ऑनलाइनदेखील खरेदी करु शकतो. तसंच ई-कॉमर्स वेबसाईटच्या माध्यमातूनही गंगाजलची बुकींग करु शकतो.
रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ही घोषणा केली आहे. मात्र हे गंगाजल किती प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे म्हणजे एका पॅकिंगमध्ये किती गंगाजल असणार आहे याची माहिती मिळालेली नाही. तसंच यासाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत याचीही माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी रवी शंकर प्रसाद यांनी डिजीटल इंडिया वॅनला हिरवा कंदील दाखवला. याद्दवारे देशभरात सरकारी योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे.
आम्ही लवकरच ही सेवा सुरु करणार असून यावर काम सुरु असल्याची माहिती पोस्टल सेक्रेटरी एस के सिन्हा यांनी दिली आहे. पोस्टाचं मोठ्या प्रमाणत नेटवर्क पसरलं आहे, याव्यतिरिक्त आम्ही लोकांपर्यत पोहोचण्यासाठी काही लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट्ससोबत हातमिळवणी करु. तसंच आमच्या वेबसाईटवरुनदेखील गंगाजलची विक्री करु असंही एस के सिन्हा बोलले आहेत.