काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खानला जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. याच तुरुंगात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईलादेखील ठेवण्यात आले आहे. लॉरेन्सने काही दिवसांपूर्वीच जोधपूर न्यायालयाच्या आवारात सलमानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे कारागृहात सलमानच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जानेवारी महिन्यात लॉरेन्सने सलमान खानला ठार मारण्याची धमकी दिली होती. काळवीट शिकार प्रकरणातच त्याने ही धमकी दिली होती. जोधपूर न्यायालयाच्या आवारातच हा संपूर्ण प्रकार घडला होता. लॉरेन्स बिष्णोईच्या विरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. खून, खंडणी, अवैध शस्त्रांचा वापर अशा अनेक गुन्ह्यांची नोंद त्याच्याविरोधात आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यात लॉरेन्सविरोधात गुन्हे दाखल आहेत. जोधपूरच्या मध्यवर्ती तुरुंगात आसारामदेखील शिक्षा भोगत आहे. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आसाराम सध्या जेलची हवा खातो आहे. आसारामने अनेकदा जामिनासाठी प्रयत्न केले आहेत. प्रकृतीचे कारण देत आसारामने तुरुंगाबाहेर पडण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र त्यात तो अपयशी ठरला आहे.
सलमानला ठार मारण्याची धमकी देणारा 'हा' गँगस्टरही त्याच कारागृहात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 9:20 AM