लखनऊ: आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास दुबेला रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विकास दुबेला काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली. आज त्याला कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला.उत्तर प्रदेश एसटीएफच्या गाडीतून विकासला कानपूरला नेलं जातं होतं. त्यावेळी बर्राजवळ गाडीला अपघात झाला. गाडी उलटल्यानं विकास दुबे आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. मात्र यानंतरही विकासनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानं एका एसटीएफ अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्यास सांगितलं. मात्र विकासनं पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. यानंतर विकास दुबे आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली. त्यात विकास दुबे मारला गेला.विकास दुबे पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चकमक सुरू झाली. त्यामध्ये विकास दुबे गंभीर झाला. त्यानंतर त्याला कानपूरच्या हॅलट रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश विकासचा शोध घेत होते. अखेर काल मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना विकास दुबेला तिथल्या काही जणांनी ओळखलं. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर विकासला अटक झाली.एका सुरक्षा रक्षकानं विकास दुबेला ओळखल्यामुळे तो पकडला गेला. विशेष म्हणजे त्याआधी विकास दुबे त्या परिसरात फोटो काढत होता. पोलिसांनी अटक केल्यावरही विकासच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप दिसत नव्हता. विकास दुबेची ओळख पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस त्याला गाडीत बसवत असताना तिथे काही लोक गोळा झाले होते. त्यांना पाहून तो 'होय, मीच विकास दुबे, कानपूरवाला' असं ओरडलं. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी विकासला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिलं.