नवी दिल्ली:दिल्लीतील तिहार तुरुंगात शुक्रवारी संध्याकाळी गँगवॉरची घटना समोर आली आहे. या गँगवॉरमध्ये लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर प्रिन्स तेवतिया मारला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही गँगवॉरची घटना तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 मध्ये संध्याकाळी 5 वाजता घडली. या घटनेत इतर कैदीही गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना दीनदयाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत गँगस्टर प्रिन्सवर 18 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृह क्रमांक 3 मध्ये दोन गटात काही मुद्द्यावरून जोरदार मारामारी झाली. यावेळी चार गुंडांनी धारदार शस्त्रांनी प्रिन्सवर हल्ला केला. तेवतियावर धारदार शस्त्राने 7 ते 8 वार करण्यात आले होते. या माहितीनंतर तिहार प्रशासनाने तातडीने सर्व जखमींना जवळच्या डीडीयू रुग्णालयात दाखल केले. तिथे तेवतियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी तपास सुरू केला आणि जखमी गुंडाची चौकशी केली. सध्या हरिनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अलीकडेच तिहार प्रशासनाने तुरुंगात छापा टाकून मोठ्या प्रमाणात सर्जिकल ब्लेड, मोबाईल इत्यादी जप्त केले होते. 9 मार्च रोजी संध्याकाळी 6.30 वाजता तिहार तुरुंग क्रमांक-3 मध्ये संशयास्पद हालचालींची माहिती तुरुंग प्रशासनाला मिळाली होती. यावर तिहार प्रशासनाने तुरुंगावर छापा टाकला होता. यावेळी एका पाकिटातून 23 सर्जिकल ब्लेड्स, ड्रग्ज आणि मोबाईल फोन जप्त केले होते.