मुंबई - सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात झाल्यापासून बहुधा प्रथमच निर्बंधासह गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ यंदा आली आहे. कोरोनामुळे सण साजरा करण्यावर बंधने आली असली तरी गणेशभक्तांच्या उत्साहात तीळभरही कमतरता दिसून आली नाही. गणपती ही बुद्धीची देवता, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी, सगळी बंधने पाळून गणेशभक्तांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या आहेत. सामाजिक संदेश देत, आरोग्या धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा आनंद आणि भरभराटी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले आहे. देशात कोरोनाचे संकट असल्याने यंदाच्या गणेशोत्सवात ढोल-बाजा-ताशांचा आवाज नाही. सार्वजनिक ठिकाणी मंडपात विराजमान झालेला बाप्पाही नाही. मात्र, गणेशभक्तांचा उत्साह तेवढाच आहे. गणरायाच्या स्वागतासाठी भक्तांची जय्यत तयारी दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही नागरिकांना गणपती उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे असे सांगतानाच सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छाही शरद पवार यांनी दिल्या आहेत.
ऑनलाईन दर्शन-आरतीपासून ते घरगुती सजावटीतील कल्पकता ही यंदाच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये आहेत. कोरोनापासून बचाव करणारी लस लवकर मिळू दे, सर्वांवर आलेले अनिश्चिततेचे मळभ लवकर दूर होऊ देत, अशी मनोमन प्रार्थना करत गणेशभक्त आज गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करत आहेत. गेल्या काही दिवसांपासूून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह काही प्रमुख शहरात तर दुकानांवरील बंधने कमी करण्यात आली आहेत. दोन दिवसांपासून इ-पास शिवाय राज्यभर एसटीचा प्रवास सुरू झाला आहे. गणपती बाप्पा अशा आणखी सकारात्मक गोष्टी घेऊनच येत असल्याचा विश्वास गणेशभक्तांना आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर कधी नव्हे इतके निर्बंध असले तरी त्यांनी त्यातही सकारात्मकता शोधली आहे. मूर्ती न आणण्यापासून, मूर्तींचे आकार कमी करण्यासारखे निर्णय घेण्यात आले. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. रक्तदान, वैद्यकीय शिबिरांचेही आयोजन होत आहे. काही मंडळांनी कोरोना काळात परिसरातील ज्येष्ठांची काळजी घेण्याचे व्रत घेतले आहे. असेच काहीसे व्रत सर्वच मुंबईकरांनी घेतले असून सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोनाशी समर्थपणे लढा देण्याचा निर्धार त्यांनी केल्याचे चित्र आहे.