आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात करार होऊनही काँग्रेसने दिल्लीतील आपल्या जाहीर सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आमंत्रित केले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी दिल्लीतील अशोक विहार (रामलीला मैदान) येथे १८ मे रोजी जाहीर सभा घेणार आहेत.
केजरीवाल यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्यापासून अंतर राखत असल्याचे दिसत आहे. अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा ‘इंडिया’तील बहुतेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले, परंतु राहुल गांधींनी कोणतेही वक्तव्य केले नाही. लखनौमध्ये ‘इंडिया’च्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे पोहोचले, परंतु नियोजित असूनही केजरीवाल पोहोचले नाहीत. तर, १६ मे राेजी त्यांनी ‘सपा’प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौत पत्रकार परिषद घेतली.
काँग्रेस नेतृत्वाचे मौन
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीतील रामलीला मैदानावर एक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सहभागी होऊन ही अटक लोकशाहीचा खून असल्याचे म्हटले होते. मात्र, अरविंद केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यावर काँग्रेस नेतृत्वाचे मौन अनेक प्रश्न निर्माण करते.