- नितीन नायगांवकरनवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात ज्ञानाची बाग फुलविण्यासाठी पुण्यातील सरहद संस्थेने पुढाकार घेतला आहे. ३७० कलम हटल्यानंतर महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्था काश्मीरमध्ये दाखल होण्यास उत्सुक असून, सरहदने तसा प्रस्ताव जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आज पाठविला आहे.सीमेलगतच्या भागांमध्ये आणि विशेषत: काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरहद सतत प्रयत्नशील आहे. आता जम्मू-काश्मीरचा केंद्रशासित प्रदेशांमध्ये समावेश झाल्यामुळे येथील शिक्षणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरहदने पुढाकार घेतला आहे. यापूर्वी २००४ मध्ये देखील एकदा संस्थेच्या वतीने असे प्रयत्न झाले होते, पण महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांनी त्यावेळी तयारी दाखविली नव्हती.यंदा महाराष्ट्रातील आघाडीच्या तब्बल २५ शैक्षणिक संस्थांशी सरहदने संपर्क साधला. त्यात सिम्बॉयसीस, व्हीआयटी, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, भारती विद्यापीठ, फर्ग्युसन कॉलेज, एस.पी. कॉलेज, गरवारे कॉलेज, केजेएस, अरहम, महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन सोसायटी, जेएसपीएमचा समावेश आहे. यापैकी सात संस्था काश्मीरमध्ये कॅम्पस सुरू करण्यास उत्सुकआहेत.काश्मीरमध्ये कॅम्पस सुरू करण्यास इच्छुक संस्था आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल यांच्यात सरहद समन्वयकाची भूमिका निभावत आहे, असे संजय नहार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल व काश्मीरमधील उद्योग व वाणिज्य संचालनालयाचे संचालक मेहमूद अहमद शाह यांनाही सरहदचे पदाधिकारी लवकरच भेटणारआहेत.काश्मीरमधील उच्च शिक्षण विभागाचे सचिव तलत परवेझ यांच्याशी सरहदने पुण्यात चर्चा केली होती. जम्मू-काश्मीरच्या उद्योग, वाणिज्य व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नवीन कुमार चौधरीही पुण्यात येणार आहेत.सुरुवातीला दहा संस्था तयार होतील आणि वेळेपर्यंत काही माघारही घेतील. पण, आम्ही सध्या फक्त शिक्षण क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे.- संजय नहार, संस्थापक, सरहद
‘सरहद’ फुलविणार ज्ञानाची बाग; महाराष्ट्रातील सात शैक्षणिक संस्था उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 5:05 AM