नवी दिल्ली - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,84,372 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,027 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,38,73,825 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,72,085 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशमध्ये आरोग्य व्यवस्थेचं भीषण चित्र समोर आलं आहे. कोरोनाच्या संकटात रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्यमंत्र्य़ांच्याच मतदारसंघामध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. रायसेन जिल्ह्यातील सांचीमधील एका सरकारी रुग्णालयात माळी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर कोरोना चाचणी घेण्याचे काम सोपवण्यात आले आहे. रुग्णालयातील इतर सर्व स्टाफला कोरोनाची लागण झाल्याने त्याला हे काम सोपवल्याची माहिती मिळत आहे. माळी कोरोना चाचण्या घेत असल्याचे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशचे आरोग्यमंत्री डॉ. प्रभुराम चौधरी (MP health minister Dr Prabhuram Chaudhary) यांच्या स्वतःच्या मतदारसंघांमध्ये ही भीषण परिस्थिती आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राजश्री तिडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, माळीला चाचणी कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. आम्ही सध्या हतबल आहे, कारण इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळेच हे माळी देखील चाचणी घेत आहेत. रुग्णालयातील इतर सर्व कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत, त्यामुळे कोरोना चाचणी करण्याचे काम मी करत आहे अशी माहिती माळीकाम करणाऱ्या व्यकतीने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यूचा जास्त धोका; रिसर्चमधून समोर आली धडकी भरवणारी माहिती
जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. संशोधनातून अधिक एक धक्कादायक माहिती आता पुन्हा एकदा समोर आली आहे. आळशी लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याचं आता समोर आलं आहे. एका रिसर्चमध्ये हा धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. व्यायाम आणि शारीरीक हालचाली कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं तीव्र असून, अशा लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असल्याची माहिती मिळत आहे. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर्स मेडिसीन या वैद्यकीय जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या संशोधनानुसार, कोरोनाची साथ येण्याच्या दोन वर्ष आधापासून ज्या व्यक्तींना व्यायाम करणं सोडून दिलं. त्याचबरोबर त्यांच्या शारीरिक हालचाली कमी आहेत. त्यांना कोरोनानंतर रुग्णालयात दाखल करावं लागतं आहे.