ऑनलाइन लोकमतकोटा, दि. 9 - राज्यस्थानमधील कोटा बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या लसणाला फक्त चार रुपये हमीभाव देण्यात आला. ही किंमत ऐकून हृदयविकाराच्या झटक्यानं त्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी शेतात घाम गाळून कष्ट करून पिक आणतो.. मात्र बाजार समित्यांमध्ये त्याची अशी क्रूर थट्टा होते.32 वर्षीय सत्यनारायण मीना याने कोटाच्या बाजारसमितीत शेतात पिकवलेला लसूण घेऊन आला होता. मात्र अवघा 4 रूपये हमीभाव मिळाल्याचं त्याने ऐकले आणि तो जागीच कोसळला. राजस्थानच्या रोईन या गावात सत्यनारायण वास्तव्यास होता आणि तिथेच त्याची शेतीही होती. तो जेव्हा जागेवरच कोसळला तेव्हा त्याला तातडीने कोटामधल्या सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिथेच त्याला मृत घोषित केले.सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानसह देशातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. महाष्ट्रात शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतमालाला मिळणारा अयोग्य हमीभाव याविरोधात आंदोलन सुरू आहे. कर्जमाफी देऊ अशी घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे. तरीही शेतकऱ्यांचा संघर्ष काही संपलेला नाही. तसेच मध्यप्रदेशातही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून संघर्ष सुरूच आहे.
लसणाला फक्त चार रुपये हमीभाव, शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
By admin | Published: June 09, 2017 6:26 PM