मुंबई : राज्यातील पात्र कुटुंबांना शोधून त्यांना गॅस जोडणी देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गेल्या महिनाभरात दीड लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस जोडणी देण्यात आली आहे. तर एप्रिलअखेर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत महाराष्ट्रात ४० लाख ६३ हजार कुटुंबांना गॅस जोडणी मिळाली आहे. तसेच वंचितांना १०० टक्के शिधापत्रिका वाटप करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना लागू करत सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचे काम अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून होत असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी दिली.
मागील काळात काही कुटुंब गॅस जोडणीच्या लाभापासून वंचित होती. यातील सर्व पात्र कुटुंबांना शोधून त्यांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ मध्ये लाभ देण्याबाबत कार्यवाही सुरु होती. त्यात काही कुटुंब सदर योजनेसाठी पात्र होणार नाहीत. त्यामुळे राज्याची स्वतंत्र योजना सुरू करण्याच्या उद्देशाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना महिनाभरात सुरू करण्यात आली. मोजक्या वेळेतच विक्रमी नोंदणी करण्यात आली.
विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभसार्वजनिक वितरण व्यवस्था बळकट करीत असताना सर्वसामान्य शेतकऱ्यालाही विकेंद्रित धान्य खरेदी योजनेचा लाभ मिळाला आहे. सन २०१८-१९ मध्ये जवळपास सव्वा दोन लाख शेतकऱ्यांकडून धान व भरड धान्याची खरेदी करण्यात आली असून त्यांच्या बँक खात्यात रकमा जमा करणे शक्य झाले आहे.राज्यातील रास्त भाव धान्य दुकानांना लागणारे धान पूर्वी भारतीय अन्न महामंडळामार्फत मिळत होते. मात्र राज्य शासनाने विकेंद्रित धान खरेदी योजना सुरु केली. त्यानुसार शेतकºयांकडून धान खरेदी करुन ती थेट राज्य शासनाकडे सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी वितरित करण्यात येत आहे. यामुळे शेतकºयांचाही फायदा होत आहे.नवप्रणालीमुळे लाभार्थ्यांची सोय...राज्यात पीडीएस-डाटा बेसमध्ये आधार फिडिंगची कार्यवाही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक शिधापत्रिकेत झाली आहे, ज्यामुळे चुकीच्या असलेल्या १० लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या. परिणामी लाभार्थ्यांना नवीन प्रणालीमुळे खात्रीशीर व योग्य दराने धान्य मिळण्याची हमी झाली आहे, अशी माहितीही अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.शिधापत्रिका वाटप मोहिमेस भरघोस प्रतिसाद मिळाला असून १५ जुलै ते १५ आॅगस्ट २०१९ या कालावधीत संपूर्ण राज्यात १ लाख ५० हजार ५९६ कुटुंबांना पत्रिका वाटप करण्यात आली आहे. ज्याद्वारे ५ लाख ३४ हजार २१ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात गती मिळाली. महिनाभरात राज्यात दिलेल्या गॅस जोडणी आणि शिधापत्रिका वाटप हे त्याचेच उदाहरण असल्याचे संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.