बिहारच्या औरंगाबादमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे.या घटनेत ३० जण भाजल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकातील ७ कर्मचारीही भाजले आहेत.या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना बिहारमधील औरंगाबादच्या शहागंज परिसरातील असून, अनिल गोस्वामी यांच्या घरी महिला छठ पूजेसाठी प्रसाद बनवत होत्या. यावेळी सिलिंडरमधून गॅसगळती झाल्याने घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच आजूबाजूचे लोकही आग आटोक्यात आणण्यासाठी पोहोचले. दरम्यान, माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे गस्ती पथकही तेथे पोहोचले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र यादरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात ७ पोलिसांसह एकूण ३० जण जखमी झाले.
टेक ऑफ दरम्यान IndiGo विमानाच्या इंजिनला आग, मोठा अपघात टळला; पाहा Video
सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील १० जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टकरांनी दिली.
"घरी छठ उत्सव सुरू होता.सर्व कुटुंब प्रसाद बनवण्याच्या तयारीत होते. यावेळी गॅस गळू लागला आणि सिलिंडरला आग लागली, मग लोक इकडे-तिकडे धावू लागले, मग आजूबाजूचे लोक तिथे पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यात आग वाढत होती,परिसरात गोंधळ वाढला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी शहर पोलीस ठाण्यातील अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तेथे पोहोचून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र त्याआधीच सिलिंडरचा स्फोट होऊन ३० जण गंभीर भाजले होते, अशी माहिती पीडित कुटुंबाचे प्रमुख अनिल गोस्वामी यांनी दिली.