नवी दिल्ली : केंद्र सरकारने मंगळवारी घरगुती वापरासाठीच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमतीत २०० रुपयांनी कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देताना गृहिणींना एकप्रकारे रक्षाबंधनाची भेटच दिली. रक्षाबंधनाच्या दिवशी ३० ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. याशिवाय सरकार उज्ज्वला योजनेअंतर्गत ७५ लाख नवीन सिलिंडर जोडणी मोफत देणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व लोकांसाठी एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एकूण ४०० रुपयांचे गॅस अनुदान मिळणार आहे. त्यांना आधीच २०० रुपये अनुदान मिळत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आता ७०३ रुपयांना सिलिंडर मिळेल. काेराेना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर जून २०२० पासून गॅस सिलिंडरवरील अनुदान बंद करण्यात आले हाेते.
आजपासून अंमलबजावणीकिमतीतील कपातीची भरपाई कशी होईल, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. किरकोळ इंधन विकणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्या बुधवारपासून किमती कमी करतील, असे मानले जात आहे. नंतर सरकार त्याची भरपाई करेल.
उज्ज्वला योजनेसाठी ७६८० कोटींचा भारया निर्णयाचा सरकारच्या तिजोरीवर किती परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यासंदर्भात ठाकूर म्हणाले की, उज्ज्वला योजनेअंतर्गत ग्राहकांना प्रति सिलिंडर २०० रुपये एलपीजी सबसिडी दिली जात आहे. चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये त्याची किंमत ७,६८० कोटी रुपये असेल. उज्ज्वला लाभार्थी केवळ ९.६ कोटी आहेत, तर ३१ कोटी ग्राहक स्वयंपाकासाठी एलपीजी वापरतात.
भगिनींना अधिक दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात २०० रुपये प्रति सिलिंडर कपात करण्याच्या सरकारच्या घोषणेचे स्वागत केले. रक्षाबंधनाचा सण कुटुंबातील आनंद वाढवणारा आहे आणि ही कपात भगिनींना अधिक दिलासा देईल, त्यांचे जीवन सुसह्य करील. माझी प्रत्येक बहीण आनंदी आणि निरोगी राहो, हेच देवाकडे मागणे, असे मोदी म्हणाले.
चंद्रयान-३ यशाचे काैतुककेंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी चंद्रयान-३ मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर ‘सॉफ्ट लँडिंग’ची प्रशंसा करणारा ठराव संमत केला. या मोहिमेचे यश हे अंतराळातील भारताच्या वैज्ञानिक यशापेक्षाही देशाच्या प्रगत विचारसरणीचे, आत्मनिर्भरतेचे आणि जागतिक मंचावरील उदयोन्मुख नवभारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे, असे त्यात म्हटले आहे.
मते कमी होऊ लागल्यावर निवडणुकीच्या भेटवस्तू वाटल्या जाऊ लागल्या आहेत! भाजपने लागू केलेल्या महागाईला तोंड देण्यासाठी, काँग्रेस पक्ष प्रथमच अनेक राज्यांमध्ये गरिबांना फक्त ५०० रुपयांत सिलिंडर वितरित करणार आहे. - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष,काँग्रेस
एलपीजीच्या किमती २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय विरोधी आघाडी ‘इंडिया’च्या प्रभावामुळे घेण्यात आला आहे. आतापर्यंत, गेल्या दोन महिन्यांत इंडिया आघाडीने फक्त दोन बैठका घेतल्या आहेत आणि आज, आपण पाहतो की, एलपीजीच्या किमती २०० रुपयांनी कमी झाल्या आहेत. - ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
ओणम आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरगुती गॅसचे दर घटवून पंतप्रधान माेदी यांनी सर्व बहिणींना माेठी भेट दिली आहे. - अनुराग ठाकूर