नवी दिल्ली : विमान इंधनाच्या दरात (एटीएफ) ५.५ टक्के वाढ करण्यात आली असून, ही वाढ सलग पाचव्यांदा झाली आहे. तथापि, विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ११ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.या दरवाढीमुळे आता दिल्लीत विमान इंधनाचा दर ५.४७ टक्क्यांनी वाढत प्रति किलो लीटर ४९,२८७.१८ रुपये झाला आहे. जून महिन्यात विमान इंधनाच्या दरात ९.२ टक्के वाढ करण्यात आली होती. मार्चपासून सलग पाच महिने विमान इंधनाच्या दरात २५ टक्के (९,९८५ रुपये) वाढ झाली आहे. विमानाचे इंधन पेट्रोल व डिझेलपेक्षा स्वस्त आहे. दिल्लीत १ लीटर पेट्रोलचा भाव ६४.७६ रुपये, तर डिझेलचा दर ५४.७० रुपये आहे. विमान इंधनाचा दर प्रति लीटर ४९.२८ रुपये आहे. विमान इंधनाचा दर स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित करामुळे (व्हॅट) विविध विमानतळावर वेगवेगळा असेल. विमान सेवा कंपन्यांच्या खर्चात विमान इंधनांचा वाटा ४० टक्के असतो. (लोकमत न्यूज नेटवर्क)
गॅस सिलिंडर ११ रुपयांनी स्वस्त
By admin | Published: July 02, 2016 5:59 AM