जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे लोक हे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये बिपरजॉय चक्रीवादळादरम्यान राजस्थानमधील एका गावात मुसळधार पावसात गॅस सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचं प्रशंसनीय काम दिसून येतं. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी आहे, हा गॅस डिलिव्हरी मॅन बाडमेरच्या ढोक गावात एका घरात गॅस सिलिंडर पोहोचवताना दिसत आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिले, "चूल पेटत राहिल, देश वाढतच जाईल. उर्जेची उपलब्धता सुनिश्चित करत आहे. कर्तव्यासाठी प्रशंसनीय समर्पणाने, भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील हा निडर सैनिक जगत आहे. बिपरजॉयचा प्रभाव असताना हिंमत दाखवली आणि राजस्थानच्या बारमेरच्या ढोक गावात एका ग्राहकाच्या घरी इंडेन रिफिलचा पुरवठा केला." नेटिझन्सनी कर्मचार्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली आहे.
"पेट्रोलियम क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे" असं एका युजरने म्हटलं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसऱ्या युजरने लिहिलं की, त्याच्या समर्पणाला सलाम. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लाखो लोकांनी कमेंट बॉक्समध्ये गॅस डिलिव्हरी मॅनचे कौतुक केले आहे.
एका युजरने गॅस डिलिव्हरी मॅनच्या समर्थनार्थ लिहिलं की, "मला सांगायचं आहे की या डिलिव्हरी करणाऱ्या लोकांचा पगार कमी आहे. ते हा भार वाहतात आणि स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अनेकजण दररोज शेकडो मैल चालतात. प्रत्येक परिस्थितीत ते लोकांच्या घरी गॅस पोहोचवतात. आता त्यांच्या वेतनाचा आढावा घेण्याची आणि त्यात सुधारणा करण्याची वेळ आली आहे. तसेच त्यांना कार्यक्षम वितरणासाठी चांगल्या वाहनांची गरज आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.